वेस्ट बँकमधील हिंसाचार अधिकच तीव्र होईल

इस्रायली लष्कराच्या गुप्तचर विभागप्रमुखांचा इशारा

Amit Saarजेरूसलेम – ‘आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी इस्रायलने उभ्या केलेल्या सुरक्षाविषयक रचनेला आत्तापर्यंत फार मोठे यश मिळाले खरे. पण आता या रचनेला धक्के बसत आहेत. त्यामुळे इस्रायलची अंतर्गत सुरक्षा बाधित होऊन, पॅलेस्टिनी तरुणांमध्ये वाढत असलेल्या असंतोषामुळे वेस्ट बँकमधील हिंसाचार अधिकच तीव्र होईल. 2023 सालात इराणपासून असलेल्या धोक्यानंतर वेस्ट बँकमधील वाढता हिंसाचार हा इस्रायलसाठी दुसऱ्या क्रमांकाचा धोका ठरेल’, असा इशारा इस्रायली लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल एमिट सार यांनी दिला.

2021 साली वेस्ट बँकमधील कट्टरपंथियांकडून इस्रायलींवर हल्ल्याच्या 91 घटना घडल्या होत्या. पण यावर्षी वेस्ट बँकमधील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या अकरा महिन्यांमध्ये इस्रायली नागरिक तसेच जवानांवरील हल्ल्याच्या 281 घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यातील बळींमध्ये इस्रायली सुरक्षा दलांच्या जवानांची संख्या मोठी आहे. मार्च महिन्यापासून इस्रायली सुरक्षा दलांनी वेस्ट बँकमध्ये केलेल्या कारवाईत अडीच हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.

West Bank will intensifyवेस्ट बँकमधील कट्टरपंथियांनी धारदार शस्त्रांऐवजी बंदूक, रायफल्स यांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे उघड झाले आहे, याकडे ब्रिगेडिअर जनरल सार यांनी लष्करी अभ्यासगटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लक्ष वेधले. पॅलेस्टाईनच्या तरुण पिढीचा या हिंसाचारातील सहभाग वाढला असून वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांचे प्रशासन तरुणांवर प्रभाव टाकण्यात अपयशी ठरली आहे. याउलट हमास, इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांचा या तरुण पिढीवरील प्रभाव चिंताजनक असल्याचे ब्रिगेडिअर जनरल सार यांनी म्हणाले.

वेस्ट बँकमधील हा हिंसाचार, इस्रायली नागरिक व सुरक्षादलांवरील वाढते हल्ले, इस्रायलसाठी मोठे आव्हान ठरते. इराणच्या धोक्यानंतर वेस्ट बँकमधील हिंसाचार इस्रायलच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या क्रमांकाचा धोका ठरतो, असा दावा सार यांनी केला. तर वेस्ट बँकमधील हिंसाचार रोखण्यासाठी नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. या हिंसाचारामागील कारणे शोधून त्यावर कारवाई करणे गरजेचे ठरते, याकडे लष्कराच्या गुप्तचर विभागप्रमुखांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जवळपास तीन महिन्यांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांवरही ब्रिगेडिअर जनरल सार यांनी आपली मते मांडली. इराणमधील हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू झालेली ही निदर्शने लवकरच शांत होतील, इराणची राजवट त्यात यशस्वी ठरेल. पण या निदर्शनांमुळे येत्या काळात इराणच्या राजवटीसमोर अधिक मोठे आव्हान उभे राहिल, असा दावा सार यांनी केला.

leave a reply