ट्रम्प यांच्यावरील महाभियोग म्हणजे डेमोक्रॅट पक्षाने राष्ट्राध्यक्ष पदाविरोधात छेडलेले युद्ध

- सिनेटमधील रिपब्लिकन नेते लिंडसे ग्रॅहम यांचे टीकास्त्र

डेमोक्रॅटवॉशिंग्टन – सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाने राष्ट्राध्यक्ष पदाविरोधातच युद्ध छेडले आहे, अशी घणाघाती टीका अमेरिकी संसदेच्या सिनेटमधील रिपब्लिकन नेते लिंडसे ग्रॅहम यांनी केली आहे. भविष्यात अमेरिकेचे कोणतेही राष्ट्राध्यक्ष सुरक्षित नसून त्यांच्याविरोधात पद सोडल्यानंतरही अवघ्या ५० तासांच्या अवधीत कारवाई होऊ शकते, अशी भीतीही ग्रॅहम यांनी व्यक्त केली. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनीही ट्रम्प यांच्याविरोधात सुरू झालेल्या महाभियोग कारवाईवर टीकास्त्र सोडले असून, मतदारांना मूळ मुद्यांपासून विचलित करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेऊन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अमेरिकी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकप्रतिनिधीगृहाने १३ जानेवारी रोजी ट्रम्प यांच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया मंजूर केली आहे. त्यानंतर मंगळवारपासून संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमध्ये कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते लिंडसे ग्रॅहम यांनी या प्रक्रियेवरून डेमोक्रॅट पक्षाला लक्ष्य केले.

डेमोक्रॅट

‘१३ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधीगृहात ट्रम्प यांना दोषी ठरविण्याची प्रक्रिया अयोग्य होती. ७४ वर्षांच्या ट्रम्प यांना त्यांच्या बचावाची संधीही देण्यात आली नव्हती. डेमोक्रॅट पक्षाने केलेली ही कारवाई म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदाविरोधात छेडलेले युद्धच होते’, असा ठपका ग्रॅहम यांनी ठेवला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दोषी ठरविण्यासाठी ज्या गोष्टींचा आधार घेण्यात आला, त्यावरून अमेरिकी नागरिकाविरोधात ट्रॅफिकचे नियम तोडल्याची कारवाईदेखील होऊ शकत नाही, असा दावा रिपब्लिकन नेत्यांनी केला. डेमोक्रॅट पक्षाला राष्ट्राध्यक्षपदच उद्ध्वस्त करायचे आहे, या शब्दात लिंडसे ग्रॅहम यांनी डेमोक्रॅट्सना धारेवर धरले.

अमेरिकेच्या संस्थापकांना खाजगी नागरिकांच्या पाठीशी ससेमिरा लावायचा नव्हता. त्यामुळेच त्यांनी शिक्षा ठेवताना राष्ट्राध्यक्षपद सोडणे हीच कारवाई निश्‍चित केली होती. याचा अर्थ ही कारवाई माजी राष्ट्राध्यक्षांवर केली जाऊ शकत नाही, असाच होतो. तरीही पद सोडल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या मागे लागणे हा महाभियोगाच्या कारवाईचा उद्देश कधीही नव्हता. भविष्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यापासून रोखणे हादेखील त्याचा हेतू नाही’, असा दावा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केला.

डेमोक्रॅट‘डेमोक्रॅट पक्षाची कारवाई चुकीचा पायंडा घालून देत असून त्याने भविष्यात येणार्‍या सर्व राष्ट्राध्यक्षांना धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात केवळ द्वेषाच्या आधारावर कोणत्याही सुनावणी अथवा वकिलाशिवाय ५० तासांच्या अवधीत राष्ट्राध्यक्षांना दोषी ठरविले जाऊ शकते. अशा तर्‍हेने अमेरिकेचे संस्थापक असलेल्या जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याविरोधातही गुलामांच्या मुद्यावरून महाभियोगाची कारवाई केली जाऊ शकते’, याकडे लिंडसे ग्रॅहम यांनी लक्ष वेधले. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनीही माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात सिनेटने सुरू केलेल्या कारवाईवर टीकास्त्र सोडले आहे.

‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीतील आघाडीच्या सूत्रसंचालिका लॉरा इन्ग्रॅहम यांनी, ट्रम्प यांच्याविरोधात संसदेत सुरू असलेल्या कारवाईचा वापर पारंपारिक विचारसरणीच्या मतदारांचे नैतिक धैर्य खच्ची करण्यासाठी होत असल्याचा आरोप केला. त्याचवेळी अमेरिकी जनतेविरोधात डाव्या विचारसरणीच्या गटांनी उठाव केला असून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन त्याचे प्रमुख आहेत, असा दावाही इन्ग्रॅहम यांनी केला.

leave a reply