टोकिओमध्ये पार पडलेल्या क्वाडच्या बैठकीत चीनला सज्जड इशारा

चीनला सज्जड इशाराटोकिओ – टोकिओमध्ये पार पडलेल्या भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या बैठकीत चीनला सज्जड इशारा देण्यात आला आहे. आक्रमक, चिथावणीखोर अथवा एकतर्फी कारवाईद्वारे इंडे-पॅसिफिक क्षेत्रातील यथास्थिती बदलून इथला तणाव वाढविण्याचे प्रयत्न खपवूनघेतले जाणार नाहीत. यामध्ये वादग्रस्त क्षेत्रातील लष्करीकरण, तटरक्षक दलाचा आणि हल्लेखोर जहाजांच्या पथकांचा धोकादायकरित्या केल्या जाणाऱ्या वापराचा समावेश आहे. तसेच इतर देशांच्या किनारी क्षेत्राजवळील उत्खननाच्या कारवाया करून अव्यवस्था माजविणाऱ्या हालचालींनाही क्वाडचा प्रखर विरोध असेल, असे क्वाडने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात बजावण्यात आले आहे.

जपानची राजधानी टोकिओ इथे पार पडलेल्या क्वाड नेत्यांच्या दुसऱ्या बैठकीत जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बानीज सहभागी झाले होते. या बैठकीकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले होते. विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया चिंताजनक पातळीवर पोहोचलेल्या असताना, क्वाडने संयुक्त निवेदनाद्वारे चीनला कडक भाषेत संदेश दिला आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य व शांतता आणि समृद्धी यांना आव्हान देण्याचे चीनचे प्रयत्न यापुढे सहन केले जाणार नाहीत, असे क्वाडने चीनला बजावल्याचे दिसत आहे.

प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे पालन करावेच लागेल. ईस्ट व साऊथ चायना सीसह ह संपूर्ण इंडे-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी व हवाई वाहतुकीचे स्वातंत्र्य अबाधित रहायला हवे, असे क्वाडच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर मुंबईवर झालेल्या 26/11 तसेच पठाणकोठ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची क्वाडच्या निवेदनात कठोर शब्दात निर्भत्सना करण्यात आली आहे. सर्वच प्रकारचा दहशतवाद व हिंसक कट्टरवादाचा क्वाड निषेध करीत असल्याचे या निवेदनात ठासून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, क्वाडने अल्पावधित फार मोठे यश मिळविल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी क्वाडच्या बैठकीत यावर समाधान व्यक्त केले. तसेच क्वाड ही इंडो-पॅसिफिक क्षेत्रात रचनात्मक धोरण राबवित असून यामुळे विधायक संघटना अशी क्वाडची प्रतिमा बनली आहे. यामुळे क्वाडची व्याप्ती वाढत चालली आहे. क्वाडदेशांचे परस्परांवरील विश्वास व निर्धार यामुळे लोकशाहीवादी शक्तींना नवी ऊर्जा व उत्साह मिळत आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.

क्वाड देशांनी कोरोनाच्या संकटानंतरही, जागतिक हवामानबदलाविरोधी उपाययोजना, पुरवठा साखळीची अधिक भक्कम उभारणी व आपत्ती निवारणासाठी त्वरित प्रतिसाद देणारी यंत्रणा तसेच आर्थिक सहकार्याच्या आघाडीवरील समन्वय वाढविला आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

जपानमधील या क्वाड बैठकीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांची जपान व ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा पार पडली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेत आपण दोन्ही देशांमधील भागीदारी विकसित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. तर भारत व अमेरिकेची भागीदारी विश्वासावर आधारलेली असल्याचे लक्षात आणून दिले. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याशी द्विपक्षीय चर्चेबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे, योशिहिदे सुगा आणि योशिरो मोरी यांचीही भेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर आपली फलदायी चर्चा पार पडली, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले.

leave a reply