हाँगकाँगमध्ये जे झाले त्याची पुनरावृत्ती तैवानमध्ये होऊ नये

- जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे

टोकिओ/तैपेई/बीजिंग – ‘हाँगकाँगमध्ये जे घडले त्याची पुनरावृत्ती तैवानमध्ये कधीही होता कामा नये’, असे जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी बजावले आहे. यावेळी त्यांनी चीनकडून साऊथ चायना सी व ईस्ट चायना सीमधील ‘जैसे थे’ स्थिती बदलण्यासाठी एकतर्फी प्रयत्न चालू असल्याबद्दल चिंताही व्यक्त करण्यात आली. अ‍ॅबेंकडून करण्यात आलेल्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून प्रतिक्रिया उमटली असून, अमेरिका व जपानने तैवानमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला आहे.

हाँगकाँगमध्ये जे झाले त्याची पुनरावृत्ती तैवानमध्ये होऊ नये - जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे‘जपान-रिपब्लिक ऑफ चायना डायट मेंबर्स कन्सल्टेटिव्ह कौन्सिल’ या अभ्यासगटाने ‘ट्रायलॅटरल स्ट्रॅटेजिक डायलॉग’चे आयोजन केले होते. या सेमिनारमध्ये अमेरिका व जपानसह तैवानचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जपानचे माजी पंतप्रधान अ‍ॅबे अभ्यासगटाचे सल्लागार म्हणून कार्यरत असून तेही या डायलॉगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी तैवानची तुलना हाँगकाँगशी करीत चीनच्या राजवटीकडून सुरू असलेल्या कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

शिन्झो अ‍ॅबे यांनी अमेरिका व तैवान या दोन्ही देशांना ‘सीपीटीपीपी’ या बहुराष्ट्रीय व्यापारी करारात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याचवेळी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’मध्ये तैवानमधील सहभागाचे समर्थनही केले. चीन तैवानच्या सहभागाचे खुल्या मनाने स्वागत करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. खुल्या व मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी तैवानची भूमिका महत्त्वाची असल्याकडेही जपानच्या माजी पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले.

या बैठकीत जपानचे सहा संसद सदस्यही सहभागी झाले होते. जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनीही सदर बैठकीसाठी विशेष संदेश पाठविल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेकडून जपानसाठीचे माजी राजदूत बिल हॅगर्टि ‘ट्रायलॅटरल स्ट्रॅटेजिक डायलॉग’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी जपान, अमेरिका व तैवानच्या प्रतिनिधींनी सातत्याने बैठक आयोजित करून त्रिपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही घेतल्याचे सांगण्यात येते.

हाँगकाँगमध्ये जे झाले त्याची पुनरावृत्ती तैवानमध्ये होऊ नये - जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबेजपान व अमेरिकेने तैवानसोबत घेतलेल्या या बैठकीवर चीनकडून प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिका व जपानने तैवानच्या स्वातंत्र्यांच्या मुद्याला समर्थन मिळेल, अशी पावले उचलू नयेत व तैवान मुद्यावर ढवळाढवळ करु नये, असे चीनचे परराष्ट्र प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी बजावले. बैठकीत जुनेच मुद्दे उगाळण्यात आले असून कोणीही त्याकडे लक्ष देत नसल्याचा दावाही चिनी प्रवक्त्यांनी केला.

गेल्या काही वर्षात जपान व चीनमधील संबंधांमध्ये सातत्याने चढउतार सुरू असून सध्या तणाव वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. चीनकडून ईस्ट चायना सीमध्ये वारंवार सुरू असणारी घुसखोरी, कोरोनाच्या साथीबाबत केलेली लपवाछपवी, हाँगकाँगवर लादण्यात आलेला कायदा आणि आर्थिक व लष्करी सामर्थ्याच्या बळावर दडपण टाकण्याचे प्रयत्न या मुद्यांवर जपानने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन देशांमध्ये यावरून सातत्याने शाब्दिक चकमकी व संघर्ष उडत असल्याचेही समोर येत आहे. या तणावात तैवानच्या मुद्याचीही भर पडली असून जपानने या मुद्यावर अधिक आग्रही भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे माजी पंतप्रधान अ‍ॅबे यांच्या वक्तव्यावरून समोर येत आहे.

leave a reply