हिजाब परिधान करणाऱ्या महिलाही इराणच्या राजवटीविरोधात रस्त्यावर उतरल्या

हिजाब परिधानतेहरान – माहसा अमिनी या तरुणीने हिजाबसक्तीविरोधात सुरू केलेल्या चळवळीचे रूपांतर आता इराणव्यापी आंदोलनामध्ये झाले आहे. इराणच्या यंत्रणांनी सुरू केलेल्या कठोर कारवाईनंतर आता हे आंदोलन केवळ हिजाबसक्तीच्या विरोधापुरते मर्यादित राहिलेले नाही. कामगार, मजूर, व्यापारी वर्ग देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. याला इराणच्या राजवटीविरोधातील आंदोलनाचे स्वरूप मिळू लागले असून हिजाब परिधान करणाऱ्या महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत आहे.

माहसा अमिनी, निका शाकरमी यांच्यानंतर आता 16 वर्षाची विद्यार्थीनी सरिना इस्माईलझदेह हिची निघृणरित्या हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सोशल मीडियावरील व्लॉग्सद्वारे प्रसिद्ध असलेली सरिना देखील गेल्या महिन्यापासून इराणमध्ये भडकलेल्या निदर्शनात सहभागी झाली होती. 23 सप्टेंबर रोजी इराणच्या अल्ब्रोझ प्रांतातील गोहरादश्त शहरात सुरक्षा यंत्रणांनी बॅटनने केलेल्या मारहाणीत सरिनाचा बळी गेल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केला आहे. तर याप्रकरणी सरिनाच्या कुटुंबीयांवर मौन राखण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही या मानवाधिकार संघटनेने केला.

शुक्रवारी सरिनावरील या कारवाईची माहिती उघड झाल्यानंतर इराणमधील राजवटविरोधी आंदोलनाची तीव्रता वाढली. इराणमधील राजवटीची पकड असलेल्या मशाद सारख्या शहरांमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये हिजाब परिधान केलेल्या महिला देखील सहभागी झाल्या आहेत. आत्तापर्यंत या आंदोलनाचे स्वरुप हिजाबसक्तीविरोधी होते. त्यामुळे या आंदोलनात इराणच्या शाळा, कॉलेजमधील विद्यार्थिंनी सहभागी झाल्या होत्या.

गेल्या आठवड्यात इराणच्या राजवटीने विद्यार्थिनी व तरुणींच्या विरोधात हिजाब परिधान केलेल्या महिलांनीही निदर्शने केली होती. आत्तापर्यंत सदर आंदोलन हिजाब समर्थक व विरोधकांमध्ये असल्याचे दावे केले जात होते. पण आत्ता हिजाबसक्तीच्या विरोधातील या आंदोलनात हिजाब घातलेल्या महिलाही सहभागी झाल्यामुळे हे आंदोलन इराणच्या राजवटीच्या कट्टरपंथी विचारसरणीविरोधात असल्याचा दावा पाश्चिमात्य विश्लेषक करू लागले आहेत. इराणच्या राजवटीचा प्रभाव असलेल्या शहरांमधूनच या निदर्शनांना पाठिंबा मिळत असल्याचेही हे विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी शनिवारी राजधानी तेहरानमधील विद्यापीठाला भेट दिली. यावेळी राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी सदर आंदोलन म्हणजे दंगल असून यात सहभागी झालेल्या दंगलखोरांवर कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. त्याबरोबर रईसी यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या विद्यार्थिनींनी ‘गेट लॉस्ट’ अर्थात ‘चालते व्हा’, असे म्हणत राष्ट्राध्यक्षांविरोधात घोषणा दिल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून इराणच्या जनतेमध्ये राष्ट्राध्यक्ष रईसी तसेच सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या राजवटीविरोधात संताप असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याची चिंता व्यक्त करून फ्रान्स व नेदरलँड्स या देशांनी आपल्या नागरिकांना तातडीने मायदेशी पोहोचण्याची सूचना केली आहे. इराणची राजवट या आंदोलनासाठी परदेशी नागरिकांना जबाबदार धरून अटक करू शकतात, बेकायदेशीररित्या न्यायालयीन कारवाई करू शकतात, असा आरोप करून फ्रान्स व नेदरलँड्सने आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचे आदेश दिले आहेत.

leave a reply