जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या साडेआठ कोटींवर

- अमेरिका व युरोपमधील तीव्रता वाढली

वॉशिंग्टन/लंडन – दैनंदिन व सार्वजनिक व्यवहारांवर लादलेले निर्बंध आणि लसीकरण मोहिमेनंतरही जगभरातील कोरोना साथीची तीव्रता वाढत असल्याचे समोर येत आहे. अमेरिका व युरोपमध्ये साथीचे रुग्ण तसेच बळींचे प्रमाण गेले काही आठवडे सातत्याने वाढत असून त्यामागे ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा प्रकारही (स्ट्रेन) कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. अमेरिका व युरोपपाठोपाठ आशियातही साथीचा फैलाव वाढत असून, जपानमध्ये आणीबाणी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आठ कोटी ५१ लाखांवर गेली आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिका व युरोपमध्ये अनेक ठिकाणी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली होती. त्याचवेळी लसीकरणाची मोहिमही सुरू झाली असून लाखो जणांना लस देण्यात आल्याचे संबंधित देशांच्या आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात आले. मात्र या उपाययोजनांनंतरही अमेरिका व युरोपमध्ये कोरोनाच्या साथीची तीव्रता वाढत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेत गेले पाच दिवस सातत्याने सव्वा लाखांहून अधिक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये तब्बल चार लाख ८० हजारांहून अधिक जणांची भर पडली आहे. अमेरिकेतील रुग्णांची संख्या दोन कोटी ६ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाच्या साथीत दगावणार्‍यांची संख्या सुमारे दीड हजारांनी वाढली असून बळींची संख्या साडेतीन लाखांहून अधिक झाली आहे. फैलाव वाढत असतानाच अमेरिकेत शनिवारी तब्बल ११ लाख ९२ हजार नागरिकांनी हवाईप्रवास केल्याची नोंद झाली आहे.

अमेरिकेपाठोपाठ युरोपिय देशांमध्येही कोरोनाची साथ हाहाकार उडवित असल्याचे दिसत आहे. ब्रिटनमध्ये गेले सहा दिवस सातत्याने दररोज ५० हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. शनिवारी ५७,७७० तर रविवारी ५४,९९० रुग्ण वाढल्याची माहिती ब्रिटीश यंत्रणांनी दिली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तब्बल ८० टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमधील ‘स्टॅटिस्टिक्स एजन्सीज्’नी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या ९० हजारांवर जाऊन पोहोचली आहे.

ब्रिटनमधील अनेक रुग्णालये सध्या जवळपास ९० टक्के क्षमतेने भरल्याचे सांगण्यात येते. मात्र ही गोष्ट फारच सौम्य असून येणार्‍या काही महिन्यात आरोग्यव्यवस्थेवर जबरदस्त ताण येऊ शकतो, असा इशारा ब्रिटनमधील तज्ज्ञांनी दिला आहे. ब्रिटनमधील या रुग्णवाढीमागे गेल्या वर्षी आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनबरोबरच इतर युरोपिय देशांमध्येही कोरोना साथीचा फैलाव वाढत असल्याचे समोर येत आहे. युरोपमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या जवळपास अडीच कोटी झाली असून पाच लाख ५२ हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली.

अमेरिका व युरोपपाठोपाठ जपान आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई देशातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जपानमध्ये गेल्या २४ तासात तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४४हजार, ५५९ झाली आहे. तर कोरोनाच्या साथीत दगावणार्‍यांची संख्या ३,६१२ झाली आहे. गेले काही दिवस रुग्णांमध्ये दररोज एक हजारांहून जास्त रुग्णांची भर पडू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक गव्हर्नर्सनी आणीबाणी लागू करण्याची मागणी केली आहे. तर दक्षिण कोरियात रुग्णांची संख्या ६४ हजारांवर गेली असून सप्टेंबर महिन्यानंतर रुग्णांच्या आकडेवारीत १६७ टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदविण्यात आली आहे.

leave a reply