कोरोना साथीचे मूळ म्हणून ‘वुहान लॅब’ची चौकशी करण्यात यावी

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांची मागणी

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे चिनी लष्कराशी संबंध आहेत. २०१९ मध्ये या प्रयोगशाळेतील संशोधक वटवाघुळाशी निगडित कोरोनाव्हायरसवर प्रयोग करीत होते. हा व्हायरस जनुकीय पातळीवर सध्या पसरलेल्या कोरोनाव्हायरसशी ९६ टक्क्यांहून अधिक मिळताजुळता आहे. वुहान प्रयोगशाळेतील काही संशोधकही २०१९मध्ये आजारी पडले होते व त्यांच्यात सध्याच्या कोरोना रुग्णांप्रमाणे लक्षणे दिसून आली होती’, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला. यावेळी पॉम्पिओ यांनी, अमेरिकेकडे यासंदर्भातील गोपनीय माहिती उपलब्ध असून ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) वुहान लॅबची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे.

गुरुवारी ‘डब्ल्यूएचओ’चे पथक कोरोनाव्हायरससंदर्भातील चौकशी करण्यासाठी चीनमध्ये दाखल झाले आहे. मात्र हे पथक नक्की काय करणार, याबाबत चीन तसेच ‘डब्ल्यूएचओ’कडूनही पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही. त्यातच या पथकाला वादग्रस्त ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ला भेट नाकारण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उघड केलेली माहिती तसेच त्या आधारावर केलेली मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते. ही माहिती उघड करतानाच, चीनने अजूनही कोरोनाव्हायरसच्या उगमाबाबत तसेच इतर मुद्यांवर योग्य माहिती आंतरराष्ट्रीय समुदायासमोर खुली केली नसल्याचा ठपकाही पॉम्पिओ यांनी ठेवला आहे. अमेरिकेकडे उपलब्ध असलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या दाव्यात, परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी ‘आरएटीजी१३’ या विषाणूचा उल्लेख केला. हा वटवाघुळाशी संबंधित असणारा कोरोनाव्हायरस असून वुहानमधील प्रयोगशाळेत यावर २०१६ सालापासून संशोधन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रयोगशाळने सदर व्हायरससंदर्भात मिळवलेली सर्व माहिती गायब केली आहे, असा दावाही पॉम्पिओ यांनी केला. त्याचवेळी वुहानमधील लॅब नागरी यंत्रणा असल्याचा दावा करीत असली तरी २०१७ सालापासून या प्रयोगशाळेत चीनच्या लष्कराशी संबंधित संशोधन सुरू आहे, असा आरोपही अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

‘डब्ल्यूएचओ’ने वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला भेट देऊन कोरोनाची साथ येण्यापूर्वीचे सर्व संशोधन तपासावे, अशी मागणी पॉम्पिओ यांनी केली आहे. जगातील विविध संशोधनसंस्था तसेच तज्ज्ञांनी, कोरोनाव्हायरसची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत झाली असावी व त्यातून तो अपघाताने किंवा जाणुनबुजून बाहेर पसरविण्यात आला असावा, असे दावे केले आहेत. चीनमधील पत्रकार व संशोधकांकडूनही याला दुजोरा देण्यात आला होता. मात्र यासंदर्भातील सर्व माहिती चीनच्या सत्ताधारी राजवटीने दडपली आहे.

जगभरात हाहाकार माजविणार्‍या कोरोनाव्हायरसची निर्मिती चीनच्या वुहान लॅबमध्येच झाली असून त्याचे शास्त्रीय पुरावे आपण लवकरच उघड करू, असा दावा चिनी संशोधिका डॉ. ली मेंग यान यांनी, गेल्या वर्षी केला होता. विषाणूचे मूळ जाणून घेणे जरुरीचे असून, तसे नाही घडले तर तो जगातील प्रत्येकासाठी धोकादायक ठरू शकतो, असेही चिनी संशोधिकेने बजावले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोना साथीचे मूळ चीनमध्येच असल्याचा आरोप करून त्याची जबर किंमत चीनला मोजणे भाग पडेल, असे बजावले होते.

leave a reply