जम्मू काश्मीरच्या डोडा येथील चकमकीत एक जवान शहीद

- 'हिजबुल'चे दोन दहशतवादी ठार

जम्मू – जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधे उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. चकमकीत ‘हिजबुल मुजाहिदीन’चे दोन दहाशतवादी ठार झाले आहेत. या भागात शोध मोहीम सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

डोडा जिल्ह्यात ‘हिजबुल’चा दहशतवादी ताहीर अहमद भट लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफतर्फे शनिवारी रात्री या भागात संयुक्त शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सुरक्षादलाचे जवान दहशतवाद्यांचा अमानसामाना झाला. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक जवान गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या हा जवान उपचारादरम्यान शहीद झाल्याचे जम्मू विभागातील पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंग यांनी सांगितले. चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ताहीर भटला जानेवारी महिन्यापासून सुरक्षादल शोधत होते. या भागातील हिजबूलचा कमांडर हरून चकमकीत ठार झाल्यावर डोडामधील हिजबूलच्या दहशतवादी कारवाया ताहिरच्याच नेतृत्वाखाली सुरु होत्या. त्यामुळे ताहीर ठार होणे सुरक्षादलांसाठी मोठे यश मानले जात आहे.

डोडामध्ये दहशतवाद्यांविरोधात हाती घेण्यात आलेली मोहीम अद्याप सुरु असल्याची माहिती पोलिस प्रवक्ते आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) मनोज शेरी यांनी दिली. जम्मू-काश्मीरमध्येदेखील कोरोना विषाणूच्या फैलाव होत असतानाच या काळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. जम्मूचा डोडा, किश्तवार आणि रामबन जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. या भागांना दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र या भागात दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय लष्कराचे जवान व जम्मू-काश्मीरच्या पोलीसदलावरील हल्ले, त्यांचे अपहरण व हत्या यासारख्या भयंकर कारवायांचा सूत्रधार असलेला ‘हिजबुल मुजाहिदीन’चा कमांडर रियाज नायकू चकमकीत ठार झाला होता. त्यानंतर डोडा जिल्ह्यात एका ओव्हरग्राउंड वर्करला अटक करण्यात आली होती. १७ एप्रिल रोजी किश्तवार जिल्ह्यातील डाचन भागात सुरक्षा दलाने ‘हिजबुल मुजाहिदीन’ च्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते .या दहशतवाद्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती.

leave a reply