इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने सिरियातून माघार घेण्याचा रशियाचा सल्ला

माघारलंडन/तेहरान – गेल्या काही आठवड्यांमध्ये इस्रायलने सिरियातील इराण व इराणसंलग्न गटांवरील हल्ले तीव्र केले आहेत. अशा परिस्थितीत, इराणने सिरियातील आपल्या गटांना माघारी घ्यावे, असा सल्ला रशियाने दिला आहे. सिरियन अधिकाऱ्याच्या हवाल्याने लंडनस्थित अरब वर्तमानपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली. यावरुन इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे रशिया इराणवर दबाव टाकत असल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला. पण इस्रायलची प्रतिमा उजळविण्यासाठी असा प्रचार केला जात असल्याचा आरोप करून इराणने हे वृत्त फेटाळले आहे.

गेल्या महिन्यात सिरियातील लष्करी व हवाईतळांवरील हल्ले वाढले आहेत. सिरियन लष्कर व माध्यमे या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरत आहे. इस्रायलची लढाऊ विमाने लेबेनॉनच्या हवाईहद्दीचा वापर करून हल्ले चढवित असल्याचा ठपका सिरियाने ठेवला होता. यापैकी सिरियाच्या हमा आणि हमदिया शहरांमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांचे तीव्र पडसाद सिरियासह इराण व रशियातही उमटले होते.

हमा येथील लष्करी तळावर झालेल्या हवाई हल्ल्यात इस्रायलने इराणसंलग्न दहशतवादी संघटनेला लक्ष्य केल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता. या हल्ल्यात इराणचे जबर नुकसान झाले होते. या तळावर रशियन बनावटीची हवाई सुरक्षा यंत्रणा तसेच इतर शस्त्रसाठा होता. तसेच हमदिया शहरात झालेल्या हल्ल्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर रशियाचा हवाईतळ असल्यामुळे सदर बातमीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते.

यानंतर रशियाच्या तीन वरिष्ट अधिकाऱ्यांनी सिरियातील इराणच्या लष्करी तळांवर आक्षेप घेतल्याचे, ‘अशराक अल-अवसात’ या लंडनस्थित सौदी अरेबियाच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे. रशियाला सिरियामध्ये स्थैर्य अपेक्षित आहे. पण इराण व इराणसंलग्न गटांचे सिरियातील तळ इस्रायलच्या हल्ल्यांचे कारण ठरत आहेत. त्यामुळे काही काळासाठी इराणने सिरियातून माघार घ्यावी, अशी मागणी या रशियन अधिकाऱ्यांनी केल्याचे सदर वर्तमानपत्राने सिरियन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते.

मात्र इराणच्या ‘नूर’ वृत्तसंस्थेने लंडनस्थित सौदीच्या वर्तमानपत्राचा हा दावा फेटाळला. रशियाने इराणकडे अशी कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही, असे या इराणी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इस्रायलच्या सिरियातील हल्ल्यांना देखील सौदीच्या वर्तमानपत्राने अवास्तव महत्त्व दिल्याची टीका ‘नूर’ने केली आहे. मात्र इस्रायलचे सिरियातील हल्ले अस्साद राजवटीबरोबरच रशियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला आव्हान देत असल्याचे इस्रायली विश्लेषकांचे म्हणणे आहे. इस्रायलने सिरियातील हल्ले रोखावे, असे रशियाने याआधी इस्रायलला बजावले होते. मात्र सिरियातील इराणसंलग्न गटांच्या हालचालींपासून आपल्याला संभवणारा धोका कायम असेपर्यंत हे हल्ले थांबणार नाहीत, असे इस्रायलने रशियाला सुनावले होते. हे हल्ले नको असतील, तर इराणच्या सिरियातील हालचाली रोखा, असे इस्रायलने रशियाला बजावले होते.

leave a reply