तीन महिन्यात १०० अब्ज डॉलर्सची विक्रमी निर्यात

नवी दिल्ली – सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत प्रथमच १०० अब्जापेक्षा जास्त निर्यात झाली आहे. कोणत्याही तिमाहीत आतापर्यंत कधीही इतकी निर्यात नोंदविण्यात आलेली नाही. त्यामुळे या विक्रमी निर्यातीमुळे पहिल्या सहा महिन्यातील भारताची एकूण निर्यात १९७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून देशाची अर्थव्यवस्था वेगाने झेपावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शुक्रवारीच सप्टेंबर महिन्याचा जीएसटी महसूल जाहीर झाला होता. सप्टेंबर महिन्यात १.१७ लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल सरकारला मिळाला असून गेल्यावर्षीच्या सप्टेंबरच्या महिन्याच्या तुलनेत हा महसूल २३ टक्क्यांनी अधिक आहे.

सरकारने चालू आर्थिक वर्षात ४०० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्याच्या जवळजवळ निम्मे लक्ष्य पहिल्या सहा महिन्यात गाठता आले आहे. सप्टेंबरपर्यंत संपलेल्या पहिल्या सहामाहित देशातून एकूण १९७ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. यातीत १०१.८९ अब्ज डॉलर्सची निर्यात ही नुकत्याच संपलेल्या तिमाहीत झाली. जुलै ते सप्टेंबर या तिन्ही महिन्यात निर्यात ही ३३ अब्ज डॉलर्सहून अधिक झाली आहे. जुलै महिन्यात ३५.१७ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. हा कोणत्याही एका महिन्यातील आतापर्यंत झालेला निर्यातीचा विक्रम आहे. तर ऑगस्टमध्ये ३३.२८ अब्ज डॉलर्स, तर सप्टेंबरमध्ये ३३.४४ अब्ज डॉलर्स इतकी निर्यात झाली, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

सप्टेंबरमध्ये झालेल्या निर्यातीमध्ये पेट्रोलियम उत्पादन व्यतिरिक्त निर्यातीचा आकडा हा २८.५३ अब्ज डॉलर्स इतका आहे. पेट्रोलियम व्यतिरिक्त उत्पादनाच्या निर्यातीत १८.७२ टक्क्यांची सकारात्मक वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पेट्रोलियम व्यतिरिक्त उत्पादनांची निर्यात ही २४.०३ अब्ज डॉलर्स इतकी होती. थोडक्यात यावर्षी यामध्ये चार अब्ज डॉलर्सहून अधिकची वाढ दिसून आली आहे. तर २०१९ च्या सप्टेंबर महिन्याचा विचार करता पेट्रोलियम व्यतिरिक्त उत्पादनांच्या निर्यातीतील ही वाढ २६.३२ टक्के अधिक आहे. २०१९ सालच्या सप्टेंबरमध्ये पेट्रोलियम व्यतिरिक्त उत्पादनांची २२.५९ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती.

एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहा महिन्याच्या काळात पेट्रोलियम व्यतिरिक्त उत्पादनांची निर्यात ही एकूण १६९.१३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. तेच पेट्रोलिय व्यतिरिक्त रत्ने व दागिने वगळता झालेली निर्यात ही १४९.८४ अब्ज डॉलर्स इतकी आहे. निर्यातीत ८० टक्के वाटा असणार्‍या १० मुख्य उत्पादनांच्या निर्यातीमध्ये सकारात्मक वाढ दिसून आली असल्याचीही माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली. भारत सरकारने निर्यातीला अधिक चालना देण्यासाठी नुकसात इसीजीसीला अर्थात एक्सपोर्ट क्रेडीत गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला भांडवली सहाय्य करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे येत्या काळात निर्यातीला आणखी बळ मिळेल, असे दावे केले जात आहेत.

दरम्यान, जमा होणार्‍या जीएसटी महसूलातून, तसेच देशाच्या परकीय गंगाजळीतूनही भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. २०२० च्या नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत केवळ जून २०२१ वगळता इतर महिन्यात जीएसटी महसूल एक लाख कोटींपेक्षा जास्त राहिला आहे. जून महिन्यात दुसर्‍या कोरोना लाटेमुळे सरकारने जीएसटी रिटर्न दाखल करण्याबाबत कालावधीची सवलत दिल्याने ही महसूली घट दिसून आली होती. तर फेब्रुवारी महिन्यात १.४० लाख कोटींपेक्षा जास्त विक्रमी जीएसटी महसूल सरकारला मिळाला होता.

भारताची परकीय गंगाजळी ६३८.६५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. २४ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय गंगाजळीत ९९ कोटी डॉलर्सची घट दिसून आली होती. मात्र त्याआधीच्या तीन आठवड्यात परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली होती. तर जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत भारताची परकीय गंगाजळी ३४.१ अब्ज डॉलर्सने वाढल्याचे नुकतेच आरबीआयने जाहीर केले होते. परकीय गंगाजळीवर वाढलेल्या निर्यातीचा प्रभाव स्पष्ट दिसून येत आहे. देशात अर्थिक उलाढाल पूर्ववत झाल्याचे या सर्व बाबीतून स्पष्ट होते. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आता कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे सावरल्याचेही दावे होत आहेत.

leave a reply