फ्रान्स भारताला अतिप्रगत लष्करी तंत्रज्ञानाच्या विकासात सहाय्य करणार

पॅरिस – भारताला अतिप्रगत लष्करी तंत्रज्ञानाचा पुरवठा व विकासात सहाय्य करण्याची ग्वाही फ्रान्सने दिली आहे. भारत आणि फ्रान्समधील ३५ व्या धोरणात्मक चर्चेसाठी फ्रान्सच्या दौर्‍यावर असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इम्यॅन्युअल बोन यांच्यांशी चर्चा केली. तसेच फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली आणि परराष्ट्रमंत्री जीन य्वेस ली द्रियान यांच्याशीही डोवल घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये सागरी सुरक्षेशी निगडीत सहकार्य अधिक भक्कम करण्याचा निर्णय झाला. तसेच अफगाणिस्तानसह विविध आंतरराष्ट्रीय मुद्यांवर विस्तृत चर्चा पार पडली.

फ्रान्स भारताला अतिप्रगत लष्करी तंत्रज्ञानाच्या विकासात सहाय्य करणारराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिष्टमंडळ फ्रान्स दौर्‍यावर आहे. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सल्लागार इम्यॅन्युअल बोन यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाबरोबर विविध मुद्यावर चर्चा झाली. सागरी सुरक्षा, गोपनिय माहितीची देवाणघेवाण, अंतराळ आणि सायबर क्षेत्रात सहकार्य या आघाडीवर सहकार्य आणखी विस्तृत करण्यावर यावेळी अधिक भर देण्यात आला. इंडो-पॅसिफीक क्षेत्रात समान हित, मुक्त वाहतूक या मुद्यावरही यावेळी चर्चा झाली. फ्रान्सच्या इंडो-पॅसिफीक धोरणाचा भारत मुख्य स्तंभ असल्याचे फ्रान्सने यावेळी स्पष्ट केले आहे. फ्रन्सचे राजदूत इम्यॅन्युअल लॅनिअन यांनी याबाबत माहिती दिली. तसेच दोन्ही देशांमध्ये हे सहकार्य सर्व बाजून अधिकाधिक मजबूत होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बहुध्रुवियता, बहुपक्षीयता, लोकशाही मुल्य हा दोन्ही देशांमधील विश्‍वास व सहकार्याचा आधार असल्याचेही लॅनिअन यांनी अधोरेखित केले आहे.

यावेळी फ्रान्सला भारताने संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासात सर्व सहाय्य करण्याची ग्वाही दिल्याचे वृत्त आहे. फ्रान्स भारताबरोबर तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहे. सागरी, हवाई आणि भूसुरक्षेसंदर्भातील लष्करी तंत्रज्ञानासह सायबर सुरक्षा तंत्रज्ञानातही भारताबरोबर सहकार्य करण्याची तयारी फ्रान्सने दाखविल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत धोरणाला फ्रान्सने पुर्ण पाठिंबा दिला असून याअंतर्गत संरक्षणसंबंधील औद्योगिकीकरण, संयुक्त संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी सहाय्य करण्याची ग्वाही फ्रान्सने दिल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

दरम्यान इतरही अनेक जागतिक मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. यामध्ये अफगाणिस्तानचा विषय प्रमुख होता. भारत अफगाणिस्तान मुद्यावर सतत जगातील प्रमुख देेशांबरोबर संवाद साधत आहे. युरोपियन महासंघामधील प्रमुख देश असलेल्या फ्रान्सबरोबर या मुद्यावरील चर्चा भारताने आयोजित केलेल्या बैठकीपूर्वी झाली आहे. भारताने १० नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानमुद्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारस्तरीय चर्चेचे आयोजन केले आहे. यासाठी पाकिस्तानलाही आमंत्रण देण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने भारताने आयोजित केलेल्या चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मात्र इराण, रशिया आणि इतर सर्व मध्य आशियाई देशांनी या चर्चेत सामील होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सबरोबर चर्चेला महत्त्व आले आहे.

नुकतेच जी-२० बैठकीच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट झाली होती. यावेळी विविध द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली होती. यामध्ये इंडो-पॅसिफीक क्षेत्रातील सहकार्य व लष्करी सहकार्याचाही मुद्दा होता. शनिवारी भारत-फ्रान्समध्ये पार पडलेल्या धोरणात्मक चर्चा दोन्ही देशांच्या प्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाला पुढे घेऊन जाणारी असल्याचे म्हटले जात आहे.

leave a reply