अझरबैजानवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात १३ जणांचा बळी गेल्याचा दावा

येरेवान/बाकु – अझरबैजानचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असणाऱ्या ‘गांजा’वर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १३ जणांचा बळी गेला असून, ५०हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला आर्मेनियातून झाल्याचा आरोप अझरबैजानने केला असून, त्यात स्कड क्षेपणास्त्राचा वापर झाल्याचा दावा केला. तर गेले तीन आठवडे सुरू असलेल्या आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील बळींची संख्या ६३३ वर गेल्याची माहितीही देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या युद्धात बळी गेलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.
क्षेपणास्त्र
शनिवारी पहाटे गांजा शहरात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून १३ जणांचा बळी गेला. जखमींची संख्या ५० हून अधिक असून, त्यात अनेक गंभीर जखमींचा समावेश असल्याने बळींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा हल्ला आर्मेनियानेच केला असून त्यासाठी रशियन बनावटीच्या स्कड क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे. या हल्ल्यावर अझरबैजानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, याचा सूड रणांगणावर घेण्यात येईल, असा इशारा अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव्ह यांनी दिला.
क्षेपणास्त्रआर्मेनियाने आपल्यावरील आरोप स्पष्ट शब्दात फेटाळले असून, उलट अझरबैजानच ‘नागोर्नो-कॅराबख’मधील नागरी वस्त्यांवर भीषण हल्ले करीत असल्याचा ठपका ठेवला आहे. अझरबैजानने सीमाभागातील काही ठिकाणांवर ताबा मिळविला असून युद्धाच्या माध्यमातून ‘स्टेट्स को’ बदलण्याचा प्रयत्न चालू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी तुर्कीने आर्मेनियाने केलेल्या हल्ल्यांवर ‘युद्धगुन्हेगारी’ असल्याचे टीकास्त्र सोडले असून कारवाईची मागणी केली आहे.
क्षेपणास्त्र
मात्र प्रत्यक्षात आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील तुर्कीच्याच भूमिकेवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जोरदार टीका होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने तुर्कीच्या हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त केली होती. आता अमेरिकेनेही तुर्कीच्या कारवायांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, तुर्कीकडून आर्मेनिया-अझरबैजान युद्ध अधिक भडकविण्यात येत असल्याचा ठपका ठेवला. त्याचवेळी आर्मेनिया-अझरबैजान युद्ध हा दीर्घकालीन तणावाचा भाग असून त्यावर शांततामय मार्गानेच तोडगा निघू शकतो, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. युद्ध सूरु झाल्यापासून तुर्कीने ‘नागोर्नो-कॅराबख’वर लष्करी संघर्ष हाच उपाय  असल्याची आक्रमक मागणी लावून धरली होती.

 

leave a reply