लडाखच्या ‘एलएसी’वर चीनचे लष्कर थंडीने गोठले

नवी दिल्ली – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धसज्जतेचे आदेश दिले आहेत. तर चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी तैवानचे समर्थन करणार्‍या भारतीयांना सिक्कीम भारतापासून तोडण्याची धमकी दिली आहे. चीनकडून असे इशारे व धमक्या मिळत असतानाच लडाखच्या ‘एलएसी’वर भारतीय सैनिकांसमोर खडे उभे राहिलेल्या चिनी जवानांना मात्र थंडीने कापरे भरले आहे. म्हणूनच लडाखच्या ‘एलएसी’वर चीनचे जवान मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. आता इथे तैनात केलेल्या आपल्या जवानांसाठी सुमारे ३ अब्ज डॉलर्सचे विशेष तंबू व इतर आवश्यक साहित्य मागविण्याची वेळ चीनवर ओढावली आहे.

चीनचे लष्कर

तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भारतीयांनी दिलेल्या प्रतिसादावर कृतज्ञता व्यक्त केली होती. तसेच आपल्या भारत भेटीचे फोटोग्राफ्स शेअर करुन तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियावरुन भारतीयांची मने जिंकली. तसेच तैवानच्या राष्ट्रीय दिनाला भारतीय माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी चीनला चांगलीच झोंबल्याचे दिसत आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनच्या सरकारी मुखपत्राने सिक्कीम भारतापासून तोडण्याची धमकी दिली. त्यासाठी इथल्या फुटीरांना चीन हाताशी धरू शकेल, असे ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी बजावले आहे. याच दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चिनी लष्कराला युद्धसज्जतेचे आदेश दिले होते. यामागे तैवानबरोबरच भारतालाही धमकाविण्याचा हेतू असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.

याआधीही चीनने भारताल अशा स्वरुपाच्या धमक्या दिल्या होत्या. विशेषत: डोकलामचा वाद पेटलेला असताना चीन भारताला १९६२ सालच्या युद्धातील पराजयाची आठवण करुन देत होता. यावेळी युद्ध भडकले तर चिनी लष्कर दिल्लीपर्यंत धडक मारेल, असे इशारे चीनने दिले होते. पण प्रत्यक्षात डोकलामच्या भूभागात भारतीय सैनिकांना एक इंचभरही मागे ढकलणे चिनी लष्कराला जमले नव्हते. आत्ताही चीन भारताला अशा स्वरुपाच्या धमक्या देत असून वारंवार गंभीर परिणामांची धमकी देत आहे. पण लडाखच्या ‘एलएसी’वर कडाक्याच्या थंडीत युद्ध करणे बाजूला राहिले, इथे धडपणे उभे राहणेही चीनच्या जवानांना जमेनासे झाले आहे. इथल्या कडाक्याच्या हिवाळ्याने चीनचे जवान गारठू लागले असून मोठ्या संख्येने चीनचे जवान रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या येत आहेत. याचे काही व्हिडीओज देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

लडाखच्या हिवाळ्यात टिकून राहण्यासाठी चीनकडे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. चिनी जवानांना गरम अन्नापासून इतर आवश्यक गोष्टींचा मुबलक प्रमाणात पुरवठा केला जातो. पण बिचार्‍या भारतीय सैनिकांना अशा सुविधा मिळत नाहीत, अशी हळहळ ग्लोबल टाईम्सने व्यक्त केली होती. म्हणूनच भारताने या क्षेत्रातील आपले सैनिक माघारी घ्यावे, असा सल्लाही या दैनिकाने दिला होता. पण आता चीनचेच जवान थंडीने गोठले असून लडाखच्या ‘एलएसी’वर तग धरुन राहण्यासाठी त्यांना सुमारे ३ अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त साहित्याची आवश्यकता असल्याच्या मागण्या केल्या जात आहेत. त्यामुळे ग्लोबल टाईम्समार्फत चीनकडून केल्या जाणार्‍या अपप्रचाराची हवाच निघून गेली आहे. त्याचवेळी चीनचे लष्कर अव्यावसायिक असल्याची बाब देखील यामुळे जगजाहिर झाली आहे. तर दुसर्‍या बाजूला सियाचिन सारख्या सर्वोच्च ठिकाणी तैनातीचा अनुभव असलेले भारतीय सैन्य लडाखमध्ये अत्यंत उत्तम स्थितीत असल्याचे कितीतरी दाखले मिळत आहेत.

leave a reply