जगभरात दिवसाकाठी चार लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – जगात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत मोठी उसळी आली आहे. जगभरात कोरोनाचे चार लाखांहून अधिक रुग्ण दरदिवशी आढळून येत आहेत. याचे मुख्य कारण युरोपीय देशांमध्ये आलेली या साथीची दुसरी लाट ठरत आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये मिळून दरदिवशी आढळत असलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद युरोपीय देशात होत आहे.

चार लाखांहून अधिक

एका अहवालानुसार युरोपात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ्वड्यापासून युरोपात दरदिवशी १ लाख ४० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. जगात आढळत असलेल्या १०० रुग्णांमागे ३४ जण युरोपीय देशातील आहेत. ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड, स्पेन या देशांमध्ये युरोपातील अर्ध्याहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. तसेच रशियातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

फ्रान्समध्ये दरदिवशी सरासरी १९ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. बहुतांश युरोपीय देशांमध्ये शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. फ्रान्समध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इटलीमध्ये मार्च महिन्यातील दिवसाकाठीच्या रुग्ण नोंदीचा उच्चांक मोडीत निघाला आहे.

युरोपीय देशात संख्या वाढत असताना भारतात गेल्या काही दिवसापासून नोंद होणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र अद्यापही दरदिवशी ६० ते ६५ हजार नवे रुग्ण आढळत आहेत. सप्टेंबर महिन्यात दरदिवशी नोंद होणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली होती.

सध्या भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७५ लाखांवर पोहोचली आहे. तसेच देशातील या साथीने दगावलेल्या रुग्णांची संख्या १ लाख १३ हजार ७०० च्या पुढे पोहोचली आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा दर ८७.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ६६ लाख रुग्ण बरे झाले आहेत.

leave a reply