तैवानकडून संरक्षणखर्चात 14 टक्क्यांची वाढ

14 टक्क्यांची वाढतैपेई – चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर तैवानने आपल्या संरक्षणखर्चात सुमारे 14 टक्क्यांची वाढ केली. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी याची घोषणा केली आहे. तैवानला कितीही धमक्या देण्यात आल्या अथवा दडपण टाकले तरी सार्वभौमत्त्वाच्या सुरक्षेचा निर्धार बदलणार नाही, अशा शब्दात राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी यावेळी चीनला बजावले.

रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिकी काँग्रेसच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनने तैवाननजिकच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. दररोज चीनची लढाऊ विमाने तसेच युद्धनौका तैवानच्या हद्दीचा भंग करून घुसखोरी करीत असून तैवानच्या राजवटीला सातत्याने धमकावण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तैवानने आपली संरक्षणसज्जता भक्कम करण्यावर भर दिला असून संरक्षणखर्चातील मोठी वाढ त्याला दुजोरा देणारी ठरते.

पुढील वर्षासाठी तैवानने 19.41 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे. 2022 सालच्या तुलनेत संरक्षणखर्चात 13.9 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यात लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, पाणबुड्या यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त संरक्षणविभागासाठी ‘स्पेशल फंड्रस’चीही तरतूद करण्यात आली आहे.

2017 सालापासून तैवान आपल्या संरक्षणखर्चात सातत्याने वाढ करीत आहे. नव्या वाढीनंतर तैवानच्या एकूण बजेटमधील संरक्षण क्षेत्राचा वाटा 15 टक्क्यांवर पोहोचला आहे.

leave a reply