‘ओपेक’चे संकेत व इराण अणुकराराच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर पुन्हा प्रति बॅरल 100 डॉलर्सवर

प्रति बॅरल 100 डॉलर्सवरव्हिएन्ना – इंधन उत्पादक देशांची आघाडीची संघटना असणाऱ्या ‘ओपेक’ व इतर उत्पादक देशांनी तेलाच्या उत्पादनात कपातीबाबत दिलेले संकेत व इराणच्या अणुकरारावरून निर्माण झालेला संभ्रम या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर पुन्हा प्रति बॅरल 100 डॉलर्सवर उसळले आहेत. ओपेक व सहकारी उत्पादक देशांचा गट असलेल्या ‘ओपेक प्लस’ने उत्पादनात कपातीचा निर्णय घेतल्यास कच्च्या तेलाचे दर 150 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत उसळतील, असा इशारा विश्लेषकांनी दिला.

गेल्या महिन्यात जागतिक मंदीची भीती व कोरोनाच्या संसर्गात होणारी वाढ या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली होती. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या खाली आले होते. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर प्रथमच तेलाचे दर 100 डॉलर्सच्या खाली घसरले होते. त्यानंतर ओपेक व सहकारी देशांनी उत्पादनात केलेली वाढ, चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेले धक्के व मंदीचे वातावरण यामुळे दर 100 डॉलर्सखालीच राहिले होते.

प्रति बॅरल 100 डॉलर्सवर

काही दिवसांपूर्वी ओपेकमधील आघाडीचा देश असणाऱ्या सौदी अरेबियाच्या इंधनमंत्र्यांनी तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचे वक्तव्य केले होते. मोठ्या उत्पादनवाढीसाठी इंधनउत्पादक देशांकडे अतिरिक्त इंधनक्षमता पुरेशा प्रमाणात नाही, तसेच इंधनबाजारपेठेतील स्थिती सध्या डळमळीत आहे असे सांगून सौदीचे इंधनमंत्री प्रिन्स अब्दुलअझिझ बिन सलमान यांनी उत्पादनकपातीबाबत भूमिका मांडली होती. इंधनबाजारपेठेतील सध्याची स्थिती चुकीचे संकेत देत असल्याचेही सौदी मंत्र्यांनी म्हटले होते. सौदी मंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे ओपेक व सहकारी देशांनी उत्पादनातील कपातीबाबत दिलेला इशारा असल्याचे मानले जाते.

दुसऱ्या बाजूला इराणचा अणुकरार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत. पण त्यावरून असलेले संभ्रमाचे वातावरण पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा कमी राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी झालेल्या व्यवहारांमध्ये प्रति बॅरल 101.79 डॉलर्स असा दर नोंदविण्यात आला. ओपेकने आपला इशारा वास्तवात उतरविल्यास कच्च्या तेलाचे दर पुढील काळात 150 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात, असा इशारा इंधन विश्लेषक पॉल सॅन्की यांनी दिला. इंधन बाजारपेठेत अतिरिक्त साठा शिल्लक नाही, असे सौदीच्या वक्तव्यांवरून दिसून येते व ही बाव दरवाढीस कारणीभूत ठरु शकते, याकडे सॅन्की यांनी लक्ष वेधले.

leave a reply