युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या संरक्षणदलातील जवानांची संख्या दहा टक्क्यांनी वाढणार

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे आदेश

russia-defense-forcesमॉस्को – रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण होत असतानाच रशियाने आपल्या संरक्षणदलातील जवानांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी याचे आदेश दिले. त्यानुसार सध्याच्या सैन्यबळात 10 टक्क्यांची वाढ होणार आहे. जानेवारी 2023पासून सैन्यबळातील वाढीची अंमलबजावणी होईल, असे रशियन माध्यमांकडून सांगण्यात आले. रशियन संरक्षणदले जगातील आघाडीच्या संरक्षणदलांपैकी एक म्हणून ओळखली जातात. सध्या रशियन संरक्षणदलात 19 लाख, 2 हजार, 758 जवान आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आदेशानुसार, त्यात 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. जवानांच्या संख्येत एक लाख, 37 हजारांची भर पडून एकूण संख्या 20 लाख, 39 हजार 758वर जाईल, अशी माहिती रशियन माध्यमांनी दिली.

defense-forcesरशिया-युक्रेन युद्धात दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सहन करावी लागल्याचे सांगण्यात येते. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर काही आठवड्यांनी रशियाने सुमारे दीड हजार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर रशियाने युद्धात ठार झालेल्या जवानांची आकडेवारी प्रसिद्ध केलेली नाही. युक्रेन तसेच पाश्चिमात्य यंत्रणांच्या दाव्यानुसार, रशियाचे 10 हजारांहून अधिक जवान युद्धात मारले गेले आहेत.

युक्रेनमधील लष्करी मोहीम लांबण्याचे संकेत मिळत असून त्यासाठी रशियाने जवानांच्या संख्येत भर टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रशियाच्या विविध प्रांतांमधून ‘व्हॉलेंटिअर बटालियन’ तयार करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी कंत्राटी लष्करी कंपन्यांचेही सहाय्य घेण्यात येत आहे. पण रशिया-युक्रेन युद्धातील जीवितहानीचा संरक्षणदलांच्या भविष्यातील योजना व तैनातीवर परिणाम होऊ नये म्हणून थेट 10 टक्क्यांची भर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, असे सांगण्यात येते.

leave a reply