इस्रायलने सिरियात चढविलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये १५ जण ठार

- सिरियातील मानवाधिकार संघटनेचा दावा

दमास्कस – इस्रायली लढाऊ विमानांनी सिरियातील दोन लष्करी तळांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यात १५ जण ठार झाले आहेत. इराणसंलग्न हिजबुल्लाह या संघटनेच्या दहशतवाद्यांचा यामध्ये समावेश असल्याचा दावा सिरियातील मानवाधिकार संघटना करीत आहे. सिरियातील मुखपत्राने इस्रायलच्या हवाई हल्ल्यांची बातमीला दुजोरा दिला. तसेच सिरियन लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून इस्रायलचे हल्ले परतावून लावल्याचा दावा सिरियन वृत्तसंस्थेने केला आहे.

बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियन राजधानी दमास्कसजवळ दोन शहरांना लक्ष्य केल्याचे, सिरियन वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. दमास्कसच्या दक्षिणेकडील ‘अल-किशवा’ आणि पश्‍चिमेकडील ‘अल-दिमास’ या दोन शहरांवर इस्रायली विमानांनी हल्ले चढविले. या व्यतिरिक्त सिरियाच्या दक्षिणेकडील सीमाभागातही काही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे ‘सना’ने म्हटले आहे.

पण सिरियन लष्कराच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करून इस्रायलची क्षेपणास्त्रे नष्ट केले. त्याचबरोबर सिरियन लष्कराने विमानभेदी तोफांचाही वापर केल्याचे सिरियन लष्कराचे म्हणणे आहे. सिरियन लष्कर तसेच सरकारी वृत्तसंस्थेनेे याआधीही इस्रायलचे हवाई हल्ले निष्फळ केल्याचे दावे केले आहेत. मात्र सिरियन लष्कर आणि वृत्तसंस्थांकडून केले जाणारे दावे सिरियन मानवाधिकार संघटनेने चुकीचे ठरविले आहेत.

गुरुवारी देखील या मानवाधिकार संघटनेने सिरियन लष्कर आणि वृत्तसंस्थेचे दावे खोडून काढले. ‘अल-किशवे’ आणि ‘अल-दिमास’ या दोन्ही ठिकाणी हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेचे लष्करी तळ असल्याची माहिती या संघटनेने दिली. याच तळांवर चढविलेल्या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे १५ दहशतवादी ठार झाले तर काहीजण जखमी झाले आहेत. तर सिरियाच्या दक्षिणेकडील भागात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या तळावर हल्ले झाल्याची माहिती सिरियन लष्करातून बंडखोरी केलेल्या माजी सैनिकाने म्हटले आहे. गेल्या दहा दिवसात इस्रायलने सिरियात चढविलेला हा तिसरा हल्ला ठरतो. सिरियातील इराण, हिजबुल्लाह तसेच इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवरील हल्ले इस्रायलने सुरू ठेवले आहेत. इराणने कितीही धमक्या दिल्या तरी सिरियातील कारवाई थांबणार नसल्याचे इस्रायलने ठणकावले आहे.

leave a reply