अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे समर्थक संसदेवर धडकले

- निदर्शकांच्या हिंसाचारात चार जणांचा बळी, १४ पोलिस जखमी

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी बुधवारी संसदेचे सत्र सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हजारो समर्थक थेट संसदेवर धडकले. संसदेची सुरक्षाव्यवस्था व इतर अडथळे पार करून शेकडो समर्थक थेट संसदेत घुसल्याने खळबळ उडाली. यावेळी ट्रम्प समर्थक व सुरक्षायंत्रणांदरम्यान उडालेल्या तीव्र संघर्षात चार जणांचा बळी गेला असून १४ पोलीस जखमी झाले आहेत. समर्थक थेट सभागृहांमध्ये घुसल्याने संसदेचे सत्र तात्पुरत्या काळासाठी स्थगित करून संसद सदस्यांना ‘नॅशनल गार्डस्’च्या सहाय्याने सुरक्षित स्थळी नेण्यात आले. अमेरिकेच्या संसदेवर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ असून यापूर्वी १८१४ साली ब्रिटीश सैनिकांनी संसदेला आग लावली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाचे ज्यो बायडेन विजयी झाले होते. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप करून बायडेन यांच्या निवडीला आव्हान दिले होते. पण अमेरिकन निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ‘इलेक्टोरल कॉलेज’नेही बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. या प्रक्रियेत संसदेची मान्यता हा अखेरचा टप्पा मानला जातो. त्यासाठी बुधवारी राजधानी वॉशिंग्टनमध्ये संसदेचे सत्र बोलाविण्यात आले होते.

हे सत्र सुरू होत असतानाच दुपारी १२च्या सुमारास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या परिसरात ‘सेव्ह अमेरिका मार्च’ नावाने सभेचे आयोजन केले होते. या सभेला हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. सभेत ट्रम्प यांनी निवडणुकीत आपणच विजयी झाल्याचा पुनरुच्चार करीत बायडेन व इतरांनी अमेरिकी जनतेकडून विजय हिरावून घेतल्याचा आरोप केला. त्यांच्यासह इतर नेत्यांच्या भाषणानंतर ट्रम्प समर्थकांनी संसदेवर मोर्चा काढला. दुपारी दोनच्या सुमारास हजारो ट्रम्प समर्थक संसदेच्या परिसरात पोहोचले. यावेळी पोलिसांनी या समर्थकांना अडविण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न करताच ट्रम्प समर्थक आक्रमक झाले व त्यांनी पोलिसांसह इतर अडथळे तोडून थेट संसदेच्या इमारतीवर हल्लाबोल केला. बंद दरवाजे व खिडक्या तोडून, शिड्या लावून शेकडो समर्थक संसदेच्या अंतर्गत भागात घुसले. यावेळी संसदेत तैनात सुरक्षारक्षकांनी या समर्थकांना रोखण्यासाठी कारवाई सुरू केली. त्यासाठी अश्रुधूर व गोळीबाराचाही वापर करण्यात आला. ट्रम्प यांची एक समर्थक खिडकीतून आत घुसण्याचा प्रयत्न करीत असताना सुरक्षारक्षकांनी तिच्यावर गोळी झाडली. यात या महिला समर्थकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. सुरक्षायंत्रणांच्या कारवाईत एकूण चारजणांचा बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे.

ट्रम्प यांच्या समर्थकांनी थेट संसदेच्या मुख्य सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केल्याने प्रचंड गोंधळ उडाला. दुपारी तीनच्या सुमारास संसदेचे सत्र स्थगित करण्यात आले. त्यानंतर संसदेत दाखल झालेल्या ‘नॅशनल गार्डस्’च्या जवानांनी संसदेत उपस्थित असलेल्या संसद सदस्यांना सुरक्षितस्थळी हलविले. समर्थकांनी मुख्य सभागृहासह सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या कार्यालयाची नासधूस केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान १४ पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी हँडगन व पाईप बॉम्बसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. संसदेवर धडक देऊन घुसखोरी करणार्‍या ५०हून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर राजधानी वॉशिंग्टनच्या मेयरनी १५ दिवसांची संचारबंदी लागू करीत असल्याची घोषणा केली आहे. वॉशिंग्टन पोलिसांनी घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली असून संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संसदेत झालेला हिंसाचार संपूर्ण अमेरिकेसाठी मानहानीकारक घटना असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया व राजकीय वर्तुळातून उमटली आहे.

leave a reply