उत्तर कोरिया आण्विक क्षमता वाढविणार

- हुकूमशहा किम जाँग-उन यांची घोषणा

सेऊल – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी आपल्या देशाच्या आण्विक तसेच क्षेपणास्त्र क्षमतेत वाढ करण्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरियन जनता आणि देश तसेच साम्यवादी विचारांच्या संरक्षणासाठी ही कारवाई करावीच लागेल, असे हुकूमशहा उन यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील सत्ताबदलाच्या हालचालींनी वेग धरलेला असताना, हुकूमशहा किम जाँग-उन यांनी ही घोषणा केल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा यांचा आजारामुळे मृत्यू झाला व त्यांची बहिण आता उत्तर कोरियाची सूत्रे चालवित असल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. पण उत्तर कोरियन राजवटीच्या वृत्तवाहिनीने हे दावे फेटाळून किम जाँग-उन यांचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. मात्र उत्तर कोरियन हुकूमशहा उघडपणे बैठकींना हजर राहत नसल्याचे सांगून पाश्‍चिमात्य माध्यमे आणि विश्‍लेषकांनी उत्तर कोरियन वृत्तवाहिनीच्या बातमीवर अविश्‍वास दाखविला होता.

अशा परिस्थितीत, दोन महिन्यानंतर उत्तर कोरियन हुकूमशहांनी गुरुवारी आपल्या कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत हुकूमशहा किम जाँग-उन यांनी देशाच्या आण्विक व क्षेपणास्त्र सामर्थ्यात प्रचंड वाढ करणार असल्याचे जाहीर केले. कुठल्याही परिस्थितीत, हे ध्येय पूर्ण करणार असल्याचे किम जाँग-उन यांनी ठासून सांगितल्याची माहिती कोरियन वृत्तवाहिनीने दिली.

उत्तर कोरियन वृत्तवाहिनीने या बैठकीबद्दल सविस्तर तपशील जाहीर केलेले नाहीत. पण उत्तर कोरियन हुकूमशहांनी आण्विक तसेच क्षेपणास्त्र क्षमता वाढविण्याबाबत केलेली घोषणा अमेरिका आणि दक्षिण कोरियाला चिथावणी असल्याचा दावा पाश्‍चिमात्य विश्‍लेषक करीत आहेत. कारण, २०१८ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर, उत्तर कोरियाने आण्विक आणि क्षेपणास्त्रांच्या चाचण्या रोखल्या होत्या. यामुळे कोरियन क्षेत्रातील तणाव कमी झाला होता.

मात्र, आता अमेरिकेत सत्ताबदल होत असून दोन आठवड्यानंतर भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन अमेरिकेची सूत्रे हाती घेणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, उत्तर कोरियाने देखील आपल्या भूमिकेत बदल केल्याचा दावा पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांनी केला आहे.

leave a reply