नायजेरियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्या १५० वर

दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्याअबुजा – नायजेरियाच्या प्लॅटू प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्या दीडशेवर पोहोचली आहे. गार्गा जिल्ह्यातील पाच गावांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. बोको हराम या दहशतवादी संघटनेने स्थानिक दरोडेखोरांच्या टोळीशी हातमिळवणी करून हा हल्ला चढविल्याचे समोर आले आहे. दहशतवादी व दरोडेखोरांच्या या हातमिळवणीमुळे नायजेरियाच्या सुरक्षेला असलेला धोका अधिकच वाढल्याची चिंता विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यात नायजेरियात झालेला हा तिसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे.

रविवारी प्लॅटू प्रांतातील क्यॅरम, ग्याम्बाउ, डुंगूर, कुकावा व शुवाका या गावांवर भीषण हल्ले चढविण्यात आले. यावेळी घरे, गाड्या व पाळीव प्राण्यांना जाळण्यात आले. गावातील नागरिकांवर बेछूट व निर्घृण रितीने गोळ्या चालविण्यात आल्या, अशी माहिती स्थानिक सूत्र तसेच अधिकार्‍यांनी दिली. हल्लेखोर बाईक्सवरून आले होते व अनेक तास हा हल्ला सुरू होता, अशी माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला फक्त ५० बळी गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसात बळींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हल्लेखोरांनी गावाच्या जवळ असलेल्या परिसरात काही मृतदेह टाकल्याचेही समोर आले तसेच काही जखमींचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या वाढली आहे. हल्ल्यामुळे गार्गा जिल्ह्यातील गावांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण असून हजारो जणांनी इतर प्रांतांमध्ये स्थलांतर सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसात जवळपास पाच हजार जणांनी स्थलांतर केल्याची माहिती नायजेरियन मंत्र्यांनी दिली.

दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्याहल्ल्यानंतर लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. या हल्ल्यापाठोपाठ मध्य नायजेरियातच बेन्यू प्रांतात दोन हल्ले झाले असून त्यात २४ जणांचा बळी गेला आहे. मात्र हे हल्ले दहशतवाद्यांनी केले आहेत का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिकांनी या हल्ल्यांमागे दहशतवाद्यांशी संलग्न असणार्‍या फुलानी बंडखोरांचा हात असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही.

गेल्या महिन्याच्या अखेरीत रेल्वेगाडी तसेच विमानतळावर दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. त्यापाठोपाठ प्लॅटूमध्ये झालेल्या मोठ्या हल्ल्याने राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बुहारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. विरोधी पक्षांनी आणीबाणी लागू करण्याची मागणी केली आहे. संरक्षणमंत्री तसेच सुरक्षायंत्रणांच्या प्रमुखांनी राजीनामे द्यावेत, असेही विरोधकांनी आपल्या मागणीत म्हटले आहे. आफ्रिकेतील नायजेरिया हा इंधनसंपन्न व सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. गेली काही वर्षे अल कायदा, आयएस संलग्न दहशतवादी संघटना तसेच बंडखोर गट आणि लुटारुंच्या टोळ्यांनी या देशाची सुरक्षा धोक्यात टाकली आहे. सातत्याने कारवाया करूनही दहशतवादी तसेच सशस्त्र गटांवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे देशाचे स्थैर्य धोक्यात आल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे.

leave a reply