इस्रायलकडून ‘आयर्न बिम’ लेझरची चाचणी

‘आयर्न बिम’जेरूसलेम – इस्रायलच्या विरोधात सलग सहा महिने युद्ध छेडण्यासाठी आपण सज्ज असल्याची धमकी हमासने दोन दिवसांपूर्वीच दिली. याद्वारे इस्रायलवर हजारो रॉकेट्स, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचे हल्ले चढविण्यासाठी आपण तयार असल्याचे हमासने धमकावले होते. याला दोन दिवस उलटत नाही तोच, इस्रायलने ‘गेम चेंजर’ ठरणार्‍या आयर्न बिम लेझर हवाई सुरक्षा यंत्रणेची यशस्वी चाचणी केल्याचे जाहीर केले. या यंत्रणेद्वारे रॉकेट्स, मॉर्टर्स, ड्रोन्स आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे नष्ट करता येतील, असे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

इस्रायली संरक्षण मंत्रालयाच्या ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ विभागाचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल यानिव रोतेम यांनी आयर्न बिम लेझर यंत्रणेच्या यशस्वी चाचणीची माहिती दिली. तर इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी सोशल मीडियावरुन या लेझर हवाई सुरक्षा यंत्रणेचा व्हिडिओ शेअर केला. आयर्न बिम ही ऊर्जेवर आधारीत जगातील पहिली लेझर हवाई सुरक्षा यंत्रणा असल्याचा दावा पंतप्रधान बेनेट यांनी केला.

‘एखाद्या सायन्स फिक्शनमध्ये शोभेल अशी लेझर हवाई सुरक्षा यंत्रणा हे आता वास्तव बनले आहे. या यंत्रणेद्वारे ड्रोन्स, रॉकेट् आणि मॉर्टर्स हाणून पाडता येतात. यातील प्रत्येक लेझर मार्‍यासाठी फक्त साडे तीन डॉलर्स खर्च होतात’, अशी माहिती इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिली. तर वापराला सहज आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणारी इस्रायलची आयर्न बिम यंत्रणा गेम चेंजर अर्थात युद्धाचे निकाल बदलविणारी ठरेल, असा दावा यानिव रोटेम यांनी केला.

‘आयर्न बिम’इस्रायल सरकारने आयर्न बिमच्या चाचणीची माहिती गुरुवारी घोषित केली असली तरी गेल्या महिन्यातच ही चाचणी पार पडल्याचे इस्रायली यंत्रणांनी स्पष्ट केले. दक्षिण इस्रायलच्या नेगेव्हच्या वाळवंटात ही चाचणी घेतल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. गेल्या वर्षी या लेझर यंत्रणेच्या सहाय्याने इस्रायलने ड्रोन पाडले होते. तर नुकत्याच पार पडलेल्या चाचणीत क्षेपणास्त्रे आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे गारद करण्यात यश मिळाल्याचे इस्रायली संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

इस्रायली संरक्षणदलांकडे सध्या लघु पल्ल्याच्या रॉकेट्ससाठी ‘आयर्न डोम’, मध्यम-लांब पल्ल्याच्या रॉकेट्स व क्षेपणास्त्रांसाठी ‘डेव्हिड्स स्लिंग’ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी ‘ऍरो’ या हवाई सुरक्षा यंत्रणा आहेत. ‘आयर्न बिम’ ही लेझर यंत्रणा कुठल्याही प्रकारे याआधीच्या हवाई सुरक्षा यंत्रणांना पर्याय नसून त्यांना सहाय्यक ठरेल, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तसेच या वर्षअखेरीपर्यंत सदर यंत्रणा इस्रायली संरक्षणदलांच्या ताफ्यात दाखल होईल, यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचे संरक्षणमंत्री गांत्झ म्हणाले.

दरम्यान, हमास आणि इतर दहशतवादी संघटनांच्या रॉकेट्स, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सच्या हल्ल्यांपासून लेझरची भिंत इस्रायलची सुरक्षा करील, अशी लक्षवेधी घोषणा पंतप्रधान बेनेट यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. आपल्या प्रगत व यशस्वी हवाई सुरक्षा यंत्रणांसाठी प्रसिद्ध असलेल्या इस्रायलच्या या घोषणेकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधले गेले होते.

leave a reply