भारत आणि युरोपीय महासंघामध्ये १५ वी शिखर बैठक सुरु

नवी दिल्ली – ”भारत आणि युरोपीय महासंघ हे नैसर्गिक भागीदार आहेत. जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी लोकशाहीवादी शक्तींमध्ये ही भागीदारी खूप महत्वाची आहे. सध्याची जागतिक स्थिती पाहता भारत आणि युरोपीय महासंघातील या भागीदारीचे महत्व अधिक ठळकपणे समोर येत आहे”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि युरोपीय महासंघातील सहकार्याचे महत्व अधोरेखित केले.

India-EUभारत आणि युरोपीय महासंघातील १५व्या शिखर बैठकीला बुधवारी सुरुवात झाली. या व्हर्च्युअल बैठकीला पंतप्रधान मोदी बोलत होते. या शिखर बैठकीआधी मंगळवारी भारत आणि युरोपीय महासंघामधील नागरी अणुकराराला कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले. १३ वर्षाच्या वाटाघाटींनंतर या नागरी अणुकराराचा अंतिम मसुदा तयार झाला आहे.

भारत आणि युरोपीय महासंघातील संबंध बळकट करण्यासाठी दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टीकोनाची स्वीकारायला हवा. त्याबरॊबरच एक कृती आराखडा तयार करायला हवा, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ‘सर्वसमावेशकता, आंतरराष्ट्रीय संस्थांचा आदर, स्वातंत्र्य, पारदर्शकता ही सार्वत्रिक मूल्ये भारत आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकशाहीचा आधार आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी ठळकपणे सांगितले.

तसेच कोरोनाच्या संकटानंतर जागतिक पातळीवर आर्थिक क्षेत्रात जी नवी समस्या निर्माण झाली आहे, यासाठी लोकशाहीवादी राष्ट्रांमध्ये व्यापक सहकार्याची अपेक्षा आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी युरोपीय देशांनी भारतात गुंतवणूक करावी, तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवावे असे आवाहन केले.

भारत आणि युरोपीय महासंघामधील या शिखर बैठकीत सागरी सुरक्षा, व्यापार सहकार्य, गुंतवणूक याबरोबरच सीबीआय आणि युरोपोलमध्ये सहकार्यावर चर्चा होणार आहे. तसेच शिखर परिषदेनंतर या संबधी काही महत्वाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी मंगळवारी भारत आणि युरोपीय महासंघामधील नागरी अणुकराराला अंतिम स्वरूप देण्यात आल्याची बातमी आहे. भारत आणि युरोपीय महासंघ अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य व्यापक करण्यावर भर देत आहेत. यासाठी हा करार अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

leave a reply