सीमावादावरील चर्चेत भारताकडून चीनला कडक संदेश

नवी दिल्ली – भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची सीमावादावर प्रदीर्घ चर्चा पार पडली. या चर्चेत भारताच्या प्रतिनिधींनी चीनला कडक शब्दात संदेश दिल्याचे वृत्त आहे. लडाखच्या सीमेवर ५ मे पूर्वीची स्थिती कायम ठेवण्यासाठी चीनने अधिक जबाबदार भूमिका बजावण्याचे गरज असल्याचे भारताने या चर्चेत स्पष्ट केले. त्याचवेळी सीमावादाबाबत निर्धारित करण्यात आलेल्या नियमांचे चीनने काटेकोरपणे पालन करावे, अशी आग्रही मागणी भारताने केली आहे. भारताने स्वीकारलेली ही अत्यंत कठोर भूमिका चीनला ‘संपूर्ण माघार’ घेण्यास भाग पाडणारी असून त्याखेरिज भारताचे समाधान होणार नाही, असा सुस्पष्ट इशारा चीनला या चर्चेद्वारे देण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

India-China-Borderभारत आणि चीनमधील सीमावादावर चौथी महत्त्वाची बैठक मंगलवारच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. चुशूल येथे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील बैठकीत भारताचे नेतृत्त्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले. सुमारे १५ तास सुरू असलेल्या या मॅरेथॉन चर्चेत भारत आपल्या मागण्यांवर ठाम असल्याची माहिती सामोर येत आहे. या बैठकीत भारताने चीनला ‘रेड लाईन्स’ची जाणीव करुन दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सैन्याच्या माघारीचा वेग वाढविण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. गलवान व्हॅली, हॉट स्प्रिंग्स, गोग्रा प्रमाणे पँगॉन्ग त्सो, लेप्सांगमधील माघारीचा वेग वाढविण्याचा मुद्दाही भारताने उपस्थित केला. या माघारीचे वेळापत्रक निश्चित असेल आणि तसेच या माघारीची खातरजमाही केली जाईल, असे भारताने चीनला बजावले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळची तैनाती व गस्त याबाबत दोन्ही देशांनी मान्यता दिलेल्या नियमांचे चीनने काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी भारताने केली आहे. ५ मे च्याआधी लडाखच्या सीमेवरील परिस्थिती कायम ठेवण्याची मागणी करुन भारताने चीनच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही चर्चा सकारात्मक असल्याचे दावे केले आहेत. सीमावादाबाबत भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे चीनला नरमाईचे धोरण स्वीकारणे भाग पडत आहे. एकाच दिवसापूर्वी जपानने भारताबरोबरील सीमावादाला चीन कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. भरताबरोबरील सीमेबरोबरच भूतान, साऊथ चायना सी, ईस्ट चायना सी मध्येही चीन आपल्या सीमांचा विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचा ठपका जपानने ठेवला आहे.

leave a reply