अमेरिकेने अफगाणिस्तानातील पाच तळांवरून सैन्य मागे घेतले

USA-Afganistanकाबूल – अमेरिकेने अफगाणिस्तानातील पाच लष्करी तळावरून अमेरिकेने सैनिक मागे घेतले आहे. तालिबानबरोबर झालेल्या शांती करारानुसार अमेरिकेने हे तळ बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र दहशतवादविरोधी कारवाई सुरुच राहणार आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तसेच बगराम येथील अमेरिकेचा अफगाणिस्तानातील सर्वात मोठा लष्करी तळही सुरु राहणार आहे.

२९ फेब्रुवारी रोजी कतारच्या दोहा येथे अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतीकरार पार पडला होता. या करारानुसार अमेरिका अफगाणिस्तानातून ८,६०० सैन्य माघार घेणार आहे. मंगळवारी अमेरिकेच्या पेंटॅगॉनने अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या पाच तळांवरुन सैन्यमाघारीची घोषणा केली. अफगाणिस्तानातल्या हेल्मंड, उरुझगान, पतकिता, लगामन प्रांतातील अमेरिकी तळ बंद करण्यात आले.

USA-Afganistanअमेरिका आणि तालिबानच्या शांतीकराराला १३५ दिवस झाले आहेत. या करारातल्या अटींनुसार अमेरिकेचा अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. नाटोचे सैन्य तैनातीही कमी केली जाईल, असे अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नेमलेले विशेष दूत झल्मे खलिलझाद यांनी म्हटले. तर यापुढे अफगाणिस्तानातील तालिबानी कैद्यांची सुटका, हिंसाचार कमी करण्यासाठी तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये चर्चा घडवून आणणे याला प्राधान्य दिले जाईल, असे खलिलझाद पुढे म्हणाले.

अमेरिकेच्या या सैन्यमाघारीचे तालिबानने स्वागत केले. पण अमेरिकेकडून अफगाणिस्तानात तालिबानवर होत असलेल्या हवाई हल्ल्यांवर तालिबान नाराजी व्यक्त करीत आहे. त्याचवेळी शांतीकरारानंतरही तालिबानचे दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत, याकडे अमेरिका लक्ष वेधत आहे. दोनच दिवसांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानात चढविलेल्या भीषण हल्ल्यात ३० जणांचा बळी गेला होता.

leave a reply