औरंगाबादमध्ये १६ मजुरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

मुंबई/औरंगाबाद – मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाण्यासाठी गाडी मिळेल या आशेने जालन्याहून औरंगाबादकडे रेल्वे रुळावरून पायी चालत निघालेल्या १६ मजुरांचा मालगाडीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताच्या वेळेस हे मजूर पायी चालून दमल्याने काही काळासाठी रुळावरच विसावले होते. रेल्वे रुळावर मजूर झोपले आहेत ही बाब मोटरमनला फार उशिरा लक्षात आली, त्यानंतर मोटरमनने मालगाडी थांबविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या गावी परतता यावे यासाठी विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत. गुरुवारी अशीच एक विशेष गाडी औरंगाबादवरुन मध्य प्रदेशच्या भोपाळकडे रवाना झाली होती. याची माहिती मिळाल्यावर जालन्यात अडकून पडलेले १९ मजूर आपल्याला अशीच एखादी गाडी मिळेल या आशेने औरंगाबादच्या दिशेने निघाले. औरंगाबादकडे रेल्वे रुळावरून पायी चालत निघालेल्या या मजुरांनी शुक्रवारी पहाटे चालून चालून दमल्यानंतर काही काळासाठी रेल्वे रुळावरच आराम करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये रेल्वेने सर्व प्रवासी गाड्या बंद ठेवल्या असल्या तरी मालवाहतूक सुरु आहे. नांदेडहून मनमाडकडे पेट्रोल घेऊन निघालेल्या अशाच मालवाहू रेल्वेच्या खाली चिरडून यातील १६ मजुरांचा बळी गेला. यातील १४ जण जागीच ठार झाले, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन मजूर बचावले आहेत. त्यांच्या साहाय्याने मृतांची ओळख पटविण्यात येत आहे.

या दुर्दैवी अपघातात ठार झालेले सर्व मजूर जालनामधील एस. आर.जे या एकाच स्टील कंपनीत कामाला होते. तसेच हे सर्व कामगार मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच सरकारने जीव धोक्यात घालून प्रवास करू नका असे आवाहनही आपल्या गावी जाण्यासाठी निरनिराळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मजुरांना केले आहे.

leave a reply