देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५५ हजारांवर

महाराष्ट्रात एकाच दिवसात ४३ जण दगावले

नवी दिल्ली/मुंबई, (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाव्हायरसच्या साथीत दगावलेल्यांची संख्या १८०० जवळ पोहोचली आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या ५५,००० वर गेली आहे. बुधवारपासून देशात कोरोनाचे पाच हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत.  एकट्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १८ हजाराच्या नजीक पोहोचली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात एकाच दिवसात ४३ जणांचा बळी गेला, तर १२१६ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईतच ६९२ नवे रुग्ण आढळले आहेत.

देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या ५५ हजारा जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातनंतर तामिळनाडूतही या साथीच्या रुग्णांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गुजरातमध्ये गुरुवारी ३८८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे या राज्यातील रुग्णांची संख्या सात हजारांच्या पुढे गेली  आहे. मध्य प्रदेशात ११४ नव्या रुग्णांची नोंद दिवसभरात झाली. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या ३,२५२ झाली आहे. 

देशात सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्रात असून रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी राज्यात दगावलेल्या ४३ रुग्णांपैकी २४ जण मुंबईतील आहेत. तसेच पुण्यात सात, तर वसई-विरार महापालिका क्षेत्रात पाच जण दगावले आहेत.  सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १२०० पेक्षा जास्त नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७,९७४ झाली आहे. मुंबईत ६९२ नवे रुग्ण सापडले. धारावीत एकाच दिवसात आणखी ५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णाची संख्या ११,२१९ झाली आहे. 

दरम्यान राज्यात या साथीची लागण झालेल्या सुरक्षादलाचे जवान आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. गुरुवारी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात एका ‘सीआयएसएफ’च्या जवानांचा या साथीमुळे मृत्यू झाला. राज्यातील ५३१ पोलीस जवानांना या साथीची लागण झाली आहे. यामध्ये ५१ अधिकारी, तर ४८० हवालदार आहेत. मुंबईतील मध्यवर्ती कारागृह असलेल्या आर्थररोड कारागृहात २६ पोलिसांसह ७२ कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

leave a reply