संरक्षणमंत्र्याकडून ‘कैलास मानसरोवर लिंक रोड’चे उद्‌घाटन

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उत्तराखंडपासून चीनच्या सीमेला जोडणाऱ्या ‘कैलास मानसरोवर लिंक’ रोडचे उद्‌घाटन केले. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे उपस्थित होते. या लिंक रोडमुळे यात्रेकरूंचा दोन आठवड्यांचा वेळ वाचेल आणि त्यांचा प्रवास अधिक सुकर होईल, असे संरक्षणमंत्र्यानी म्हटले आहे. त्याचबरोबर हा रोड सामरिकदृष्टया भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तराखंडपासून चीनच्या सीमेजवळील लिपुलेकपर्यंतचा हा ८० किलोमीटरचा रस्ता समुद्रसपाटीपासून १७ हजार फूट उंचीवर आहे. याचे बांधकाम करणे ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’साठी(बीआरओ) आव्हानात्मक होते.

बीआरओने प्रतिकूल परिस्थितीत हा रस्ता उभारल्याचे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यासाठी बीआरओचे कौतुक केले. उत्तराखंडच्या घाटीबागार पासून सुरु होणारा हा रोड लिपुलेक अर्थात चीनच्या सीमेपर्यंत जातो. हा मार्ग कैलास मानसरोवर मार्ग म्हणून ओळखला जातो. आता इथे लिंक रोड झाल्याने यात्रेकरू आठवडाभरातच कैलास मानसरोवरला पोहोचतील. त्याआधी यात्रेकरुंना तीन आठवड्यांचा कालावधी लागायचा. आता नव्या लिंक रोडमुळे त्यांचा वेळ आणि कष्ट वाचतील. याचा फायदा इथल्या स्थानिकांना मिळेल. तसेच या क्षेत्रातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यानी व्यक्त केला. या लिंक रोडमुळे चीनच्या सीमेनजिक लष्करी हालचाली अधिक जलदगतीने करता येतील, अशी माहिती लष्कराच्या अधिकार्‍यांनी दिली. शुक्रवारी उद्‌घाटन सोहळ्यानंतर नऊ वाहनांच्या ताफ्याला हिरवा कंदील दाखविला. यात चार लहान वाहने, एक बीआरओ आणि आयटीबीपीच्या वाहनाचा समावेश होता. दरम्यान, २००८ साली या लिंक रोडला मंजुरी मिळाली होती. पण काही कारणास्तव हा प्रकल्प रखडला होता. पुढे २०१८ साली या प्रकल्पासाठी अधिक निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर २०२० सालच्या एप्रिल महिन्यापर्यंत हा लिंक रोड पूर्ण होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते.

leave a reply