उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधील अपघातांमध्ये सोळा मजुरांचा मृत्यू

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात सोळा मजुरांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी अडकून पडलेले हे सर्व मजूर आपल्या गावी परतत होते. पण त्यांचा हा प्रवास जीवघेणा ठरला. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये गावी जात असलेल्या सोळा मजुरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता.

बुधवारी रात्री मध्यप्रदेशच्या गुना इथे ट्रकने बसला दिलेल्या जोरदार धडकेत आठ मजूरांना आपला जीव गमवावा लागला. हा ट्रक ६५ मजूरांना महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातल्या उन्नावच्या दिशेने जात होता. या अपघातात ५४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेशातही भयंकर दुर्घटना झाली. उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावर एका बसने पायी जाणाऱ्या १० मजुरांना चिरडले. यामध्ये ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ मजूर गंभीर जखमी झाले. हे सर्व मजूर पंजाबहून पायी बिहारच्या गोपालगंज येथे चालले होते. ही घटना थाना नगर कोतवाली परिसरात मुजफ्फरनगर देवबंद सहारनपुर राजमार्ग टोलनाक्याजवळ घडली.

बसचा ड्रायव्हर दारुच्या नशेत होता अशी माहिती मिळत आहे. पोलिसांनी या अज्ञात ड्रायव्हरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .तर बिहारमध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील उजियारपूरमध्ये बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात २ मजूरांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर मुंबईहून कटिहारला जात होते.

लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या गावी परतता यावे यासाठी विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत. तरीही काही मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा पायपीट करीतच गावाकडे जात आहे. केंद्र व राज्य सरकार या मजूरांना जीव धोक्यात घालून प्रवास करू नका असे आवाहनही करीत आहे.

leave a reply