‘एससीओ’च्या चर्चेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची पाकिस्तानला चपराक

नवी दिल्ली – ‘जग कोरोनाव्हायरसचा सामना करण्यात व्यस्त आहे. अशावेळी काहीजण दहशतवादाचा घातक व्हायरस पसरविण्यात गुंतलेले आहे’, असा टोला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लगावला. पाकिस्तानचे थेट नाव न घेता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाबरोबरच पाकिस्तान फेक न्यूज पसरवित असल्याचे घणाघाती आरोप केले. बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या(एससीओ) परराष्ट्र मंत्र्याची बैठक पार पडली. यात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यासमोरच दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. याआधी पार पडलेल्या ‘नाम’च्या व्यासपीठावरुन पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करुन पाकिस्तानचा समाचार घेतला होता.

चीन, भारत ,रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे एससीओचे सदस्य देश आहेत. २०१७ साली एससीओमध्ये भारत आल्यानंतर ही संघटना अधिकच प्रभावी बनली. बुधवारी कोरोनाव्हायरसच्या साथी संर्दभात एससीओच्या सदस्यदेशांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीत या साथीवरील उपाययोजनांवर चर्चा पार पडली. तसेच या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानला चांगलेच फटकारले. ‘दहशतवादापासून एससीओ क्षेत्राच्या सुरक्षा आणि स्थैर्याला धोका आहे. त्यामुळे एससीओच्या सदस्यदेशांनी दहशतवादाविरोधात एकजुटीने कारवाई करावी’, अशी अपेक्षा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केली. एससीओच्या या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. भारताची ही टीका परराष्ट्रमंत्री कुरेशी यांना झोंबली. नेहमीप्रमाणे कुरेशी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील जनतेवर होत असलेल्या तथाकथित अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण त्यांच्या या विधानाकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. दरम्यान, एससीओच्या या बैठकीत कोरोनाव्हायरसच्या संकटाबरोबरच अफगाणिस्तानच्या शांतीकरारावरही विशेष चर्चा पार पडली. पण याचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत.

leave a reply