अमेरिकेचा इराणवर अधिक कठोर निर्बंधांचा इशारा

न्यूयॉर्क/तेहरान – ‘लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करून इराणने संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तेव्हा सुरक्षा परिषदेने तातडीने इराणवरील निर्बंधांची मुदत वाढवावी. अन्यथा, आतापर्यंत कधीही लादले नसतील, इतके कडक निर्बंध अमेरिका इराणवर लादेल’, असा खरमरीत इशारा अमेरिकेचे विशेषदूत ब्रायन हुक यांनी दिला आहे.

अमेरिकेने इराणसाठी नियुक्त केलेले विशेषदूत ब्रायन हुक यांनी अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात, इराणवरील निर्बंध कायम रहावे यासाठी अमेरिका जोरदार प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. इराणला निर्बंधातून सवलत मिळू नये, यासंबंधी अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पाठपुरावा केल्याची माहिती हुक यांनी दिली. इराणवरील निर्बंधांचा फास आवळण्यासाठी अमेरिकेने राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू केले असून यासंदर्भात ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीशी चर्चा सुरू असल्याची माहिती हुक यांनी दिली.

या निर्बंधांच्या प्रस्तावावर सुरक्षा परिषदेतील १५ सदस्यांचे समर्थन मिळविणे अवघड असल्याचे हुक यांनी मान्य केले. कारण सुरक्षा परिषदेतील अस्थायी सदस्यांच्या पूर्ण समर्थनाबरोबर स्थायी सदस्यांचा पाठिंबा मिळविणे अत्यंत अवघड असल्याचे हुक म्हणाले. पण अमेरिकेच्या या प्रस्तावावर नकाराधिकार वापरण्यात आला तर, हे निर्बंध नव्याने लादण्याची स्वतंत्र तयारीही अमेरिकेने केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आतापर्यंत लादलेले सर्व निर्बंध एकत्रितरित्या पुन्हा इराणवर लादले जातील, असा इशारा हुक यांनी दिला.

गेल्या महिन्यात इराणने उपग्रह प्रक्षेपित केला होता. पण हे प्रक्षेपण म्हणजे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी असल्याचा आरोप अमेरिका व ब्रिटनने केला होता. ही चाचणी करुन इराणने २०१५ साली केलेल्या अणुकराराचे उल्लंघन केल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला. त्यामुळे सुरक्षा परिषदेने इराणवरील निर्बंधांची मुदत वाढवावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. पण सदर अणुकरारातून बाहेर पडलेल्या अमेरिकेने या कराराच्या मुद्यांवर बोलू नये, अशी टीका इराणने केली आहे.

दरम्यान, रशियातील इराणच्या राजदूतांनी अमेरिकेला युद्धाची धमकी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन काँग्रेसच्या परवानगीशिवाय इराणच्या विरोधात युद्ध पुकारता येणार नाही, असा ठराव पारित करण्यात आला होता. पण गेल्या आठवड्यात नकाराधिकार वापरुन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काँग्रेसचा निर्णय फेटालौं लावला. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयावर रशियातील इराणचे राजदूत काझेम जलली यांनी टीका केली. अमेरिकेने इराणच्या विरोधात कुठलीही लष्करी कारवाई केली तर इराणकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी जलली यांनी दिली आहे .

leave a reply