आसाममध्ये २.२५ लाख जणांना पुराचा फटका

पुराचा फटकागुवाहाटी – गेल्या काही दिवसांपासून आसामममध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुत्रा नदीला पूर आला आहे. आसामच्या ९ जिल्ह्यातील २.२५ लाख जणांना पुराचा फटका बसला आहे. रविवारी पुरामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यावर्षी तिसऱ्यांदा आसामला पुराचा फटका बसला असून आतापर्यंत ११८ जणांचा बळी गेला आहे.

पुराचा फटका

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. आसामच्या ९ जिल्ह्यातील २१९ गावातील नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नौगाव जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून येथील १.२५ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. नौगावसह मोरीगावमधील ३२७००, ढेमाजी जिल्हातील १७ हजार, दिब्रूगडमध्ये ११ हजार आणि तीनसुकिया जिल्ह्यातील ९३०० नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे ९९४८ हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली गेली असल्याचे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे (एएसडीएमए) सांगण्यात आले.

पुराचा फटकाबोरपणी व इतर नद्यांना आलेल्या पूरामुळे नौगाव जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. येथील अनेक बंधारे, रस्ते वाहून गेले असून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे. जोरहट जिल्ह्यातील नेमाटीघाट आणि सोनीतपूर जिल्ह्यातील तेजपूर येथे ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिया भराली नदीने सोनीतपूर जिल्ह्यातील एनटी रोड क्रॉसिंग येथे धोक्याची पातळी ओलांडली असून कोपली नदीने नागाव जिल्ह्यातील धरमतूल व कामपूर येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी अन्य मदत पोहचवण्यासाठी बचाव व मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. मात्र नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने चिंता मदत कार्यात अडथळे येत आहेत. पुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी ४३ मदतशिबिरे उभारण्यात आली आहेत.

leave a reply