चीनच्या २० विमानांची तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी

- आतापर्यंतची घुसखोरीची सर्वात मोठी घटना

तैपेई – चीनच्या तब्बल २० लढाऊ विमानांनी शुक्रवारी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली. तैवानने क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित करून तसेच लढाऊ विमाने तैनात करून त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. शुक्रवारची घटना आतापर्यंतची चीनच्या विमानांची सर्वात मोठी घुसखोरी ठरते. गेल्या काही दिवसांपासून चीनने तैवानच्या हद्दीतील आपल्या विमानांची घुसखोरी वाढविली आहे. यामागे अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने स्वीकारलेली आक्रमक भूमिका हे प्रमुख कारण मानले जाते.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या २० विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेन्टिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली. यामध्ये १० ‘जे-१६’ लढाऊ विमाने, दोन ‘जे-१० मल्टिरोल फायटर्स’, चार ‘एच-सिक्स के’ बॉम्बर विमाने, दोन ‘वाय-८ अँटीसबमरिन वॉरफेअर प्लेन्स’, एक ‘केजे-५०० एअरबोर्न अर्ली वॉर्निंग ऍण्ड कंट्रोल प्लेन आणि टेहळणीसाठी वापरल्या जाणार्‍या ‘वाय-८ टॅक्टिकल रिकनेसन्स प्लेन’ चा समावेश होता.

‘एच-सिक्स के’ बॉम्बर विमाने व दोन ‘वाय-८ अँटीसबमरिन वॉरफेअर प्लेन्स’नी तैवानच्या दक्षिण हद्दीतून तर इतर विमानांनी ‘डॉंगशा आयलंड’वरील हवाईहद्दीत घुसखोरी केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. शुक्रवारची घटना म्हणजे चीनच्या विमानांची आतापर्यंतची सर्वात मोठी घुसखोरी असल्याचा ठपका संरक्षण मंत्रालयाने ठेवला.

तैवानच्या हद्दीजवळ चिनी विमानांनी धडक मारल्यानंतर तैवानने रेडिओ संदेश पाठविला होता. तसेच आपली लढाऊ विमानेही रवाना केली होती. पण इशारे देऊनही चिनी विमाने माघार घेण्यास तयार नाहीत हे पाहून तैवानने आपली क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित केली. त्याबरोबर चिनी विमाने साऊथ चायना सीच्या दिशेने वळली. याआधी २४ जानेवारी रोजी चीनने १२ विमाने तैवानच्या हद्दीत रवाना केली होती. त्यानंतर चीनच्या लढाऊ तसेच बॉम्बर विमानांनी सातत्याने तैवानच्या हवाईहद्दीचे उल्लंघन सुरू ठेवले आहे. या महिन्यात चीनच्या विमानांनी तब्बल १३ वेळा तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेन्टिफिकेशन झोन’मध्ये घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे.

leave a reply