महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाने १६६ जणांचा बळी

- आठवडाभरात कोरोनाच्या सव्वा दोन लाख रुग्णांची नोंद

नवी दिल्ली/मुंबई – महाराष्ट्रात सलग तिसर्‍या दिवशी ३५ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच चोवीस तासात १६६ जणांचा बळी गेला आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात कोरोनाचे २ लाख २४ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच ७५३ जण दगावले आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. याच २५ जिल्ह्यांमध्ये देशात आठवडाभरात आढळलेल्या ५९.८ टक्के रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत वारंवार चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. शनिवारीही दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. या बैठकीत कोरोनाची साथ थोपविण्यासाठी सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण आढळत असलेल्या महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, छत्तीसगड व मध्य प्रदेशमध्ये अधिक लक्ष्य पुरविण्यात येत आहे. याशिवाय दिल्ली, पश्‍चिम बंगाल, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीरमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. या राज्यांना टेस्टिंग आणि लसीकरण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारपासून शनिवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशभरात ६२ हजार २५८ रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे आतापर्यंत देशात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटी १९ लाख ८ हजार ९१० झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येबाबतीत ब्राझिलला पुन्हा मागे टाकले असून सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या देशांच्या यादीत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

शनिवारी महाराष्ट्रात ३५ हजार ७२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच १६६ जणांचा बळी गेला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, पनवेल, पालघर, वसई-विरार, रायगड या भागात मिळून १० हजार ६३८ नवे रुग्ण आढळले आहेत, तसेच ३३ जणांचा बळी गेला आहे. नाशिक मंडळात ६२९९ रुग्णांची नोंद करण्यात आली असून २९ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे मंडळात ७४८२ नवे रुग्ण आढळले आहेत, तर १९ जण या साथीने दगावले आहेत. अकोला परिमंडळात २०९० नवे रुग्ण सापडले असून ३० जणांचा बळी गेला आहे. लातूर मंडळामध्ये ११ जण, औरंगाबाद मंडळात १२ जण या साथीने दगावले आहेत.

leave a reply