ब्रिटनने चीनच्या राजदूतांना समन्स बजावले

लंडन – उघुरवंशियांच्या मानवाधिकारांचा मुद्दा मांडणार्‍या ब्रिटनचे संसद सदस्य, विश्‍लषेक आणि अभ्यासगटांवर सूडबुद्धीने निर्बंध लादणार्‍या चीनच्या राजदूतांना ब्रिटनने समन्स बजावले. चीनची ही कारवाई इतर देशांसाठी आणि संसद सदस्यांसाठी इशाराघंटा असल्याचे ब्रिटनच्या संसदसदस्या नुसरत गनी यांनी म्हटले आहे. दरम्यान, ब्रिटनपाठोपाठ चीनने कॅनडाच्या सरकारी अधिकार्‍यांवरही निर्बंध लादले आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिका, युरोपिय महासंघ व ऑस्ट्रेलियासह ब्रिटनने उघुरवंशियांच्या मुद्यावर चीनविरोधात कारवाईची घोषणा केली होती. सोमवारी ब्रिटनने चीनच्या अधिकार्‍यांवर निर्बंधांची कारवाईही केली होती. अमेरिका, ब्रिटन व व मित्रदेशांनी एकत्रितरित्या केलेल्या या कारवाईने चीनच्या सत्ताधार्‍यांना जबरदस्त झटका बसला होता. यामुळे खवळलेल्या चीनने झिंजियांग आणि उघुरवंशियांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित करणार्‍या देशांच्या नेत्यांवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.

चीनने निर्बंध लादलेल्यांच्या यादीत ब्रिटनमधील संसद सदस्य सर इयान डंकन स्मिथ, टॉम ट्युगेंडहॅट, नील ओब्रायन, टिम लॉटन व नुसरत गनी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ब्रिटनचे वरिष्ठ कायदेतज्ज्ञ यांच्यासह नऊ अधिकार्‍यांवर तर चार ब्रिटिश अभ्यासगटांवर निर्बंध लादले आहेत. चीनच्या या कारवाईवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संताप व्यक्त केला. तसेच चीनने निर्बंध लादलेल्या संसद सदस्य व विश्‍लेषकांच्या पाठिशी ब्रिटनचे सरकार ठामपणे उभे असल्याची घोषणा पंतप्रधान जॉन्सन यांनी केली.

तर ब्रिटनने शुक्रवारी चीनचे राजदूत लियू शियाओमिंग यांना समन्स बजावले आहेत. शियाओमिंग हे गेली ११ वर्षे चीनचे ब्रिटनमधील राजदूत आहेत. जानेवारी महिन्यातच त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्या जागी झेंग झेगुआंग यांची नियुक्ती झाली आहे. पण झेगुआंग यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली नसून शियाओमिंग हेच ब्रिटनमधील चीनची सूत्रे हाताळत आहेत.

ब्रिटनपाठोपाठ चीनने शनिवारी अमेरिका व कॅनडाच्या नेत्यांवरही निर्बंधांची कारवाई केली. यामध्ये अमेरिकेच्या ‘कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडम’ या गटाचे अध्यक्ष गेल मँचिन आणि उपाध्यक्ष टोनी पर्किन्स यांचा समावेश आहे. तर कॅनडाचे संसद सदस्य व कॅनेडियन संसदेच्या परराष्ट्र धोरण समितीचे उपप्रमुख मायकल चॉंग यांच्यावरही चीनने निर्बंध लादले आहेत.

झिंजियांग प्रांतातील उघुरवंशियांच्या मानवाधिकारांबाबत आवाज उठविणार्‍यांच्या विरोधात चीनने सुरू केलेली कारवाई ही इतर लोकशाही देशांना झोपेतून जागे करणारी इशाराघंटा ठरते, असे ब्रिटिश संसदसदस्य गनी यांनी म्हटले आहे. आमच्याविरोधात बोललात तर तुमची कोंडी करू, अशी धमकी चीन या निर्बंधाद्वारे देत असल्याचे गनी यांनी ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

leave a reply