महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाचे 23 हजार नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता अधिकच वाढविल्या आहेत. बुधवारी राज्यात 23 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 84 रुग्ण दगावले आहेत. मंगळवारी राज्यात चोवीस तासात 17 हजार 864 नवे रुग्ण आढळले होते. यापेक्षा बुधवारी आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सुमारे 5 हजारांनी जास्त आहे.

राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचे दरदिवशी 20 हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र नोव्हेंबरनंतर राज्यातील या साथीच्या रुग्णांची संख्या कमी होत गेली. मात्र आता चार महिन्याने पुन्हा एकदा राज्यात चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे झपाट्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच रुग्णालये पुन्हा एका कोरोना रुग्णांनी भरू लागली असून मोठी कॉरंटाईन सेंटर्स पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.

बुधवारी राज्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी मुंबईत 2 हजार 377 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे मंडळात सर्वाधिक 4 हजार 811 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 21 जण दगावले आहेत. ठाणे मंडळामध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, वसई, पालघर, पनवेल, रायगडचा समावेश होतो. यामध्येही सर्वाधिक रुग्णांची नोंद कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात झाली आहे. या भागात 637 नवे रूग्ण सापडले आहेत.

ठाण्यानंतर राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद पुणे मंडळात झाली असून एकूण 5,268 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात 2,612 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1206 नव्या रुग्ण आढळले. यानंतर नागपूर मंडळात तब्बल 4 हजार 145 नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच 22 जणांचा बळी गेला. यामध्ये सर्वाधिक 2698 रुग्ण नागपूर महापालिका क्षेत्रात आढळले आहेत.

दरम्यान, बुधवारी राज्यात कोरोनाचे 9 हजार 138 रुग्ण बरे झाले. मात्र नव्या रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 91.26 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाचा वेग वाढविणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात दरदिवशी 3 लाख जणांना लस देण्यात येईल. यासाठी नियोजन सुरू असल्याचे टोपे म्हणाले. याकरीता 1880 नव्या लसीकरण केंद्रांना बुधवारी मंजुरी देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.

leave a reply