चीनने युद्धाची तयारी केल्यानंतर तैवानने साऊथ चायना सीमधील सज्जता वाढविली

तैपेई/बीजिंग – चीन कोणत्याही क्षणी तैवानविरोधात युद्ध छेडण्याच्या तयारीत असल्याचा दावा करून, तैवाननेही आपली युद्धसज्जता वाढविण्यास सुरुवात केल्याची माहिती तैवानचे संरक्षणमंत्री चिऊ कुओ-शेंग यांनी दिली. ‘साऊथ चायना सी’मधील पॅरासेल आयलंड क्षेत्रात असलेल्या ‘इटु अबा’ या बेटावरील संरक्षण तैनाती वाढविल्याचे संरक्षणमंत्री चिऊ कुओ-शेंग यांनी सांगितले. त्याचवेळी अमेरिकेने तैवानला पाणबुड्यांचे तंत्रज्ञान देण्यास मंजुरी दिल्याची माहितीही तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिली.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख अ‍ॅडमिरल फिलिप डेव्हिडसन यांनी संसदेसमोर झालेल्या सुनावणीत, चीनच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून दिली होती. येत्या सहा वर्षात चीन तैवानवर हल्ला करू शकतो असे अ‍ॅडमिरल डेव्हिडसन यांनी यात बजावले होते. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर चीनने साऊथ चायना सीमध्ये अधिक आक्रमक हालचाली सुरू केल्याचेही समोर आले होते.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच, चीनने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात महिनाभराच्या युद्धसरावाची घोषणा केली होती. त्यात चीनने क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या आपल्या विनाशिकांना उतरविले आहे. त्याचबरोबर स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होत असल्याची घोषणाही चीनने केली. त्यापाठोपाठ, तैवानपासून अवघ्या 200 किलोमीटर्सच्या हद्दीत असलेल्या हवाईतळांवर चीनने नव्या धावपट्ट्या व इतर सुविधांची उभारणी सुरू केल्याचे समोर आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिलेले माहिती महत्त्वाची ठरते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत तैवानला मोठ्या प्रमाणावर संरक्षणसहाय्य व इतर सहकार्य पुरविणारे निर्णय घेतले होते. अमेरिकेकडून मिळणार्‍या समर्थनाच्या बळावर तैवानने अंतर्गत पातळीवरही संरक्षणसज्जतेवर भर देण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेत झालेला सत्ताबदल व चीनकडून चिथावणीखोर कारवायांची तीव्रता वाढल्याने तैवानने यासंदर्भातील हालचालींना अधिक वेग दिला आहे.

चीनने साऊथ चायना सी पूर्णपणे आपला असल्याचा दावा करून त्यातील सर्व बेटसमूहांवर आपला हक्क सांगितला आहे. त्यापैकी ‘पॅरासेल आयलंडस्’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या क्षेत्रातील ‘इटु अबा’ हे बेट तैवानच्या ताब्यात आहे. चीनने तैवानविरोधात युद्ध छेडल्यास तैवानच्या मुख्य भूमीपासून दूर असलेली छोटी बेटे ताब्यात घेतली जातील, असे मानले जाते. या पार्श्‍वभूमीवर तैवानने अशा बेटांवरील आपली संरक्षणतैनाती वाढविल्याचे तैवानचे संरक्षणमंत्री चिऊ कुओ-शेंग यांनी संसदेत सांगितले.

चीनचा मुकाबला करण्यासाठी तैवानने स्वदेशी पातळीवर पाणबुडी विकसित करण्यास सुरुवात केली असून, अमेरिकेने यासंदर्भातील तंत्रज्ञान देण्यास मंजुरी दिल्याचेही तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. अमेरिकेकडून तैवानला मिळणारे प्रगत तंत्रज्ञान चीनला अधिक चिथावणी देणारे ठरु शकते, असे मानले जाते. पाणबुडीचे तंत्रज्ञान मिळाल्यानंतर अमेरिकेच्या सहाय्याने प्रगत ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम’साठीही तैवानचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

leave a reply