कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपविण्यासाठी ‘मायक्रो’ कंटेन्मेंट झोन बनविण्याच्या पंतप्रधानांच्या राज्यांना सूचना

नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट वेळीच रोखायला हवी. काही राज्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. या राज्यांमधील आलेली कोरोनाच्या साथीची नवी लाट तेथेच थोपविली नाही, तर या साथीचा देशव्यापी उद्रेक होईल, असा गंभीर इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. यामुळे कोरोनाची ही दुसरी लाट थोपविण्याकरीता जलद आणि निर्णायक कारवाईची अपेक्षा पंतप्रधानांनी राज्य प्रशासनांकडून व्यक्त केली. तसेच लॉकडाऊनपेक्षा ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ बनविण्यावर भर देण्यात यावा. हलगर्जीपणा न बाळगता मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर द्या, अशा सूचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिल्या.

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मंगळवारीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याला पुष्टी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत. देशातील सुमारे 70 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर 150 टक्क्यांनी वाढला आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

कोरोनाविरोधात देशात सुरू झालेल्या लढाईला आता एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. या काळात भारताने ज्यापद्धतीने या जागतिक साथीचा सामना केला, त्याचे जगभरात उदाहरण देण्यात येत आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 96 टक्के आहे. तसेच या साथीमुळे होणार्‍या मृत्युदराबाबतीतही भारत सर्वात कमी मृत्युदर असलेल्या देशांच्या यादीत आहे. मात्र जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावीत देशांना सातत्याने या साथीच्या नव्या लाटेचा सामना करावा लागत आहे. भारतातही या साथीचे रुग्ण कमी झाले होते. मात्र अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

कोरोनाच्या साथीविरोधात भारताने जे यश मिळविले, ते फुकट जाऊ नये, यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला लगेचच थोपवावे लागेल. ही जबाबदारी सर्वांना मिळून उचालावी लागेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. कारण काही राज्यांपर्यंत सध्या मर्यादीत असलेली लाट वेळीच रोखली नाही, तरी संपूर्ण देशभरात तीचा उद्रेक होण्याचा धोका असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भीतीचे वातावरण न पसरविता आपल्याला या नव्या लाटेवर नियंत्रण मिळवायचे आहे. यासाठी लॉकडाऊन लावण्यापेक्षा रुग्ण आढळत असलेल्या भागांमध्ये ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ बनवा. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा बाळगू नका. टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या तिन टीवर गांभिर्याने काम करा. तसेच आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढवा. काही राज्य रॅपिड एटिंजन टेस्टवर अधिक भर देत आहेत. मात्र एकूण चाचण्यांपैकी किमान 70 टक्के आरटी-पीसीआर चाचण्या झाल्या, तर ते खूप महत्त्चाचे ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, या बैठकीत पंतप्रधानांनी लस फुकट घालवू नका असेही आवाहन केले. सध्या देशात दिवसाला 30 लाख जणांना लस मिळत आहे. मात्र याबरोबर राज्यांना जे लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत, ते फुकट जाऊ नयेत याकडे गांभिर्याने लक्ष द्या, असे आवाहन पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. काही राज्यांमध्ये पुरविण्यात आलेल्या लसींपैकी काही लसी फुकट गेल्याचे समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राज्यांना हे आवाहन केले. यासाठी आधी पुरविण्यात आलेल्या अर्थात आधी उत्पादन घेण्यात आलेल्या लसींचा वापर करा आणि त्यानंतर नव्या लसींची मागणी करा, असे पंतप्रधान म्हणाले.

leave a reply