उत्तर प्रदेशातील भीषण अपघातात २४ मजूरांचा मृत्यू

लखनऊ – उत्तर प्रदेशच्या औरैयामध्ये स्थलांतरित मजुर प्रवास करीत असलेल्या दोन ट्रक एकमेकांवर धडकून झालेल्या दुर्घटनेत २४ मजूर ठार झाले. या भीषण अपघातात २० हुन अधिक मजूर जखमी झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात राजस्थान आणि दिल्लीमधून हे सर्व मजूर आपल्या घरी जात होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यापैकी एका ट्रकमध्ये ५० हून अधिच मजूर असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या चार दिवसात देशभरात विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात ४० हून अधिक मजूरांना प्राण गमवावे लागले आहेत.

रात्री साडेतीनच्या सुमरास औरैयाच्या कानपूरमार्गावर दिल्लीहून बिहारकडे जाणारा ट्रक व त्यातले मजूर एका धाब्यावर चहासाठी थांबले होते. त्यावेळी राजस्थानमधून ५०हून अधिक मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी जोरात होती की दोन्ही वाहने उलटली व रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटली. ट्रक पलटी झाल्याने श्वास गुदमरल्याने २४ मजूरांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. राजस्थानची नंबर प्लेट असलेल्या ट्रकमधील हे सर्व मजूर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे होते. जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती औरैयाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

फरिदाबाद आणि दिल्लीवरून येणारे मजूर याच मार्गाने येत आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला जातो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून जखमींना सर्वतोपरी मदत पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनाव्हायरसने देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजूरांनी मिळेल त्या वाहनाने घरी जाण्यास सुरूवात केली आहे. पण त्यांचा हा पर्याय जीवघेणा ठरताना दिसत आहे. मागील काही आठवड्यांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये ४० हून अधिक मजूरांना प्राण गमवावे लागले आहेत.

leave a reply