२६\११ चा गुन्हेगार साजीद मीर पाकिस्तानात कडेकोट बंदोबस्तात

- अमेरिकेचा अहवाल

नवी दिल्ली – २६\११च्या मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या साजीद मीर उर्फ मजीद पाकिस्तानातच आहे. इतकेच नाही त्याला पाकिस्तानच्या सरकारने विशेष सुरक्षा पुरविली आहे, असे अमेरिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या दहशतवाद्यांबाबतच्या वार्षिक अहवालातून ही बाब उघड झाली आहे. मीर आपल्या देशात नसल्याचे पाकिस्तानकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र अमेरिकेच्या अहवालातून मीरच्या ठावठिकाणासहित माहिती देऊन पाकिस्तानचा खोटारडेपणा जगजाहीर केला आहे.

26-11-Terroristसाजीद मीर याला २०१२ साली आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले होते. त्याच्या शीरावर ५० लाख डॉलर्सचे ईनाम असून मीरने मुंबई हल्ल्याच्या वेळी छाबड हाऊसमध्ये लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना होल्त्जबर्ग दांपत्याला संपविण्याच्या सूचना दिल्या होत्या. २०१० सालापर्यंत लश्कर-ए-तोयबाचा ऑपरेशनल चीफ जकी-उर-रहमान लखवीच्या सुरक्षेची जबाबदारी मीरवर होती. तसेच ‘आयएसआय’च्या इंडियन मुझाहिद्दीन ऑपरेशनचाही सदस्य होता. पाकिस्तान लष्करातून निवृत्त झाल्यावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा मीर याला पाकिस्तानच्या ‘आयएसआय’कडून लेव्हल ७ची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे, असे अमेरिकेच्या या अहवालात उघड करण्यात आले आहे.

साजीद सध्या रावळपिंडीच्या आदिया जेल रोडच्या गार्डन व्हिला हाउसिंग सोसायटी किंवा लाहोरच्या अल फैझल टाऊनमधल्या १७,सी-ब्लाॅक परिसरात राहत असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.

दहशतवाद्यांबाबतचे पाकिस्तानची भाषा व धोरण परस्पर विरोधी असल्याचे अनेकवार उघड झाले होते. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत बोलताना ओसामा बीन लादेनचा उल्लेख शहीद असा केला होता. वरकरणी पाकिस्तान काहीही सांगत असला तरी या देशाची खरी भूमिका दहशतवादाचे समर्थन हीच आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हेच दाखून दिले, असे आरोप सुरु झाले आहेत. त्याचवेळी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध विभागाकडून पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचे नंदनवन आहे, असे सिद्ध करणारे अहवाल प्रसिद्ध होत आहेत. पाकिस्तानवर येऊ घातलेल्या संकटाची पूर्वसूचना या अहवालांद्वारे मिळते आहे.

leave a reply