आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

Aasam-Floodगुवाहाटी – आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुराचा फटका राज्यातील २३ जिल्ह्यातल्या दोन हजाराहून अधिक गावांना बसला आहे. येथील पूर परिस्थिती खूपच गंभीर बनली असून जवळपास साडेनऊ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि येथील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी सहाय्य केले जाईल, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.

गेल्या आठवड्याभरापासून आसाममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ब्रम्हपुत्रेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आसामच्या तिनसुकिया, गोलाघाट आणि लखिमपूर जिल्ह्यातली गावे पाण्याखाली गेली आहेत. या जिल्ह्यातल्या नद्या दुथडी भरुन वाहत आहे. तर या पुराने राज्यातली ६८,८०६ हेक्टर इतकी शेती वाहून गेली आहे. तसेच या पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी मदतकार्याला वेग आला आहे.

Aasam-Floodआसामच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’ आणि ‘आसाम स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’ने २७ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. रविवारी सकाळी गुवाहाटीच्या खरगुली भागात भूस्खलन झाले असून यात एका महिलेचा बळी गेला. यानंतर प्रशासनाने नागरिकांना त्या ठिकाणहून बाहेर पडण्याचे आवाहन केले. आतापर्यंत या पुरात २० जणांचा बळी गेला आहे.

पुढच्या काही दिवसात आसाममध्ये पूरस्थिती अधिकच गंभीर होईल, असा इशारा यंत्रणांनी दिला आहे. तसेच त्रिपुरा, अरुणाचल , मेघालय आणि मिझोराम या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

leave a reply