26/11चा सूत्रधार मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

सुरक्षा परिषदेच्या कारवाईचे भारताकडून स्वागत

संयुक्त राष्ट्रसंघ – 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या अब्दूल रेहमान मक्की याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. हा दहशतवादविरोधी युद्धात भारताला मिळालेला फार मोठा विजय असल्याचा दावा केला जातो. आत्तापर्यंत मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात चीनने तांत्रिक कारण पुढे करून खोडा घातला होता. चीनने हा ‘टेक्निकल होल्ड’ मागे घेतल्याने अब्दूल रेहमान मक्की याच्यावर सुरक्षा परिषदेने ही कारवाई केली. चीनच्या भूमिकेत अचानक झालेला हा बदल पाकिस्तानला धक्का देणारा ठरतो. पाकिस्तानवरील आपली नाराजी चीनने अशारितीने व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली असून यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.

international terroristअब्दूल रेहमान मक्की हा ‘लश्कर-ए-तोयबा’चा संस्थापक व ‘जमात-उल-दवा’चा म्होरक्या असलेल्या हफीज सईद याचा नातेवाईक व महत्त्वाचा साथीदार आहे. 26/11च्या हल्ल्यात मक्कीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. म्हणूनच भारताने वारंवार पाकिस्तानकडे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पाकिस्तानने भारताची ही मागणी धुडकावून लावली व मक्कीच्या विरोधात भारताकडे पुरावे नसल्याचे जाहीर केले होते. भारताने सुरक्षा परिषदेत हा मुद्दा मांडून मक्की तसेच इतर दहशतवाद्यांवर कारवाईचे आवाहन केले होते. मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा सुरक्षा परिषदेत आलेला प्रस्ताव चीनने रोखून धरला होता. तांत्रिक कारण पुढे करून चीनने मक्की तसेच पाकिस्तानच्या इतर दहशतवाद्यांवरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखून धरली होती.

2022 सालच्या जून महिन्यात मक्कीवरील कारवाईचा प्रस्ताव रोखणाऱ्या चीनने आता यावरील आपला आक्षेप मागे घेतला. केवळ चीनच्या आक्षेपामुळेच मक्कीवरील ही कारवाई होऊ शकली नव्हती. त्यामुळे चीनच्या या निर्णयानंतर मक्कीला सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. यामुळे मक्की याची संपत्ती व मालमत्ता गोठविली जाऊन त्याच्या प्रवासावर निर्बंध येऊ शकतात. यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानात आणखी एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याची बाब यामुळे जगासमोर आलेली आहे. त्याचवेळी पाकिस्तानचे चीनबरोबरील मतभेद यामुळे जगजाहीर झाले असून पुढच्या काळात चीनकडून पाकिस्तानला अशा स्वरूपाचे आणखी काही धक्के बसू शकतात. अनेक कारणांमुळे पाकिस्तान व चीनमधील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानवर आर्थिक संकट कोसळलेले असताना, चीन आपल्याला पुरेशा प्रमाणात सहाय्य करीत नसल्याची तक्रार पाकिस्तान करीत आहे. काही दिवसांपूर्वी चीनमधील पाकिस्तानी दूतावासाने सोशल मीडियावरील आपल्या अकाऊंटवरून चीनमधील उघूरवंशिय इस्लामधर्मियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवण्याचा इशारा दिला होता. काही काळाने आपल्या दूतावासाचे अकाऊंट हॅक झाले होते, असे सांगून पाकिस्तानने या प्रकरणी सारवासारव केली. पण चीनने त्याची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या नव्या सरकारने अमेरिकेबरोबर हातमिळवणी करून ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर-सीपीईसी’ प्रकल्पाला धक्के दिल्याची तक्रार चीन करीत आहे.

अमेरिकेच्या सूचनेवरून पाकिस्तान तसे करीत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. या प्रकल्पावर काम करीत असलेल्या चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पुरेसे प्रयत्न करीत नसल्याचा आरोपही चीनने केला होता. यावरून चीनने पाकिस्तानला कडक शब्दात समज दिली होती. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या या तणावामुळे ‘मक्की’ला आत्तापर्यंत वाचवणाऱ्या चीनने आपल्या धोरणात बदल करून पाकिस्तानला धक्का दिला. दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याचे स्वागत करून पुढच्या काळात भारत दहशतवाद्यांवर कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करील, असे म्हटले आहे.

leave a reply