पाकिस्तानने भारताबरोबरील तीन युद्धांमधून धडा घेतला

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद – भारताबरोबरच्या तीन युद्धानंतर मिळालेला धडा आपल्या देशाने घेतलेला आहे, असे सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला चर्चेचा प्रस्ताव दिला. आखाती देशांमधील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताशी चर्चेचा प्रस्ताव देऊन खळबळ माजविली खरी. पण त्यांनी व्यक्त केलेली ही पश्चातापाची भावना त्यांच्यापुरतीच मर्यादित आहे, की ही पाकिस्तानची ‘राष्ट्रीय भावना’ आहे, असा सवाल भारतीय विश्लेषक उपस्थित करीत आहेत. आपले तारू गटांगळ्या खात असताना पाकिस्तानला सुचत असलेल्या शहाणपणाला फारसा अर्थ नाही, कारण भारताशी चर्चा करून, भारताकडून सहाय्य मिळविण्याखेरीज या देशासमोर दुसरा पर्यायच राहिलेला नाही, याची जाणीव विश्लेषक करून देत आहेत. त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीत या देशावर विश्वास ठेवता येणार नाही, हे इतिहासाने दाखवून दिले आहे, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

sharifआपल्या देशाचे तुकडे पडतील, अशी भीती पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाचे सदस्यच व्यक्त करू लागले आहेत. अन्नधान्याची टंचाई, भडकलेली महागाई आणि बेरोजगारीने पाकिस्तान डबघाईला आले असून काही दिवसांची आयात करता येईल, इतका निधी देखील पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीत राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अमेरिका व आखाती मित्रदेशांचे सहाय्य आपल्याला बचावासाठी पुरेसे ठरेल, अशी आशा पाकिस्तानला वाटत होती. पण हे सहाय्य देखील तुटपुंजे ठरेल इतके पाकिस्तानसमोरील आर्थिक संकट मोठे आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला भारताबरोबरील युद्धातून मिळालेल्या धड्यांची आठवण झाली आहे. तशी कबुलीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ‘अल अरेबिया’ या आखाती देशांमधील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. मात्र भारताबरोबरील युद्धातून धडे घेण्यासाठी या देशाला काही दशकांचा अवधी का लागला, याचे उत्तर पाकिस्तानचे पंतप्रधान देऊ शकले नाहीत.

भारताच्या पंतप्रधानांना या मुलाखतीद्वारे आपण चर्चेचा प्रस्ताव देत असल्याचे शाहबाज शरीफ म्हणाले. भारताबरोबर चर्चा हवी, पण या चर्चेतील मुद्यांमध्ये काश्मीरचाही समावेश व्हावा, असे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. आपण भारताला देत असलेल्या प्रस्तावावर पाकिस्तानातून प्रतिक्रिया आलीच, तर त्यासाठी काश्मीरचा मुद्दा आपण मांडला होता, असा बचाव करण्यासाठी ही सोय शाहबाज शरीफ यांनी करून ठेवली. पण यावेळी त्यांनी सर्वच विवाद्य मुद्यांमध्ये काश्मीरचाही समावेश असेल, असे सांगून आपण काश्मीरचा प्रश्न सध्या मागे टाकायला तयार आहोत, असा संदेश दिला. याबरोबरच भारत व पाकिस्तानमधील चर्चेत युएई मध्यस्थी करू शकेल, असे सांगून युएईच्या नेतृत्त्वाला खूश करण्याचे प्रयत्न केले.

शाहबाज शरीफ यांची ही विधाने भारतीय माध्यमांनी उचलून धरली. अखेर पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले, असा या विधानाचा अर्थ होत असल्याचे सूर भारतीय वृत्तवाहिन्यांनी लावले आहेत. मात्र माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्लेषक पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिलेल्या प्रस्तावाला फारसा अर्थ नसल्याचे म्हटले आहे. गाळात बुडत असलेल्या पाकिस्तानने दिलेल्या प्रस्तावाला काडीचीही किंमत नाही, कारण या देशासमोर दुसरा पर्यायच राहिलेला नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी सध्या संकटात सापडल्याने भारताला भावनिक आवाहन करीत असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे आपल्या लष्कर तसेच दहशतवादी संघटनांवर किती नियंत्रण आहे, असा प्रश्न माजी लष्करी अधिकारी करीत आहेत.

चहूबाजूंनी संकटात सापडल्याने पाकिस्तान भारताशी चर्चा करण्यास तयार झाला. पण परिस्थिती बदलल्यानंतर पाकिस्तान पुन्हा भारताच्या विरोधात हालचाली सुरू केल्यावाचून राहणार नाही. भारताने वेळोवेळी सदिच्छा दाखवूनही पाकिस्तानने कायम भारताचा विश्वासघातच केला. अशा विश्वासघाती शेजारी देशावर कुठल्याही परिस्थितीत विश्वास ठेवता येणार नाही, असे माजी लष्करी अधिकारी बजावत आहेत. शिवाय पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून अशारितीने चर्चेचे प्रस्ताव दिले जात असताना, त्यांचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो भारताच्या नेतृत्त्वावर अशोभनीय भाषेत टीका करीत आहेत, या विरोधाभासावरही विश्लेषक बोट ठेवत आहेत.

मात्र पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलेल्या या विधानांच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासाची उजळणी होत आहे. विशेषतः सोशल मीडियावर पाकिस्तानचे नेते व लष्करी अधिकाऱ्यांनी आधीच्या काळात केलेल्या विधानांचा दाखला भारतीय नेटकर देत आहेत. आम्ही गवत खाऊन जगू, पण अणुबॉम्ब मिळवल्याखेरीज राहणार नाही, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो म्हणाले होते. त्यांची ही इच्छा पूण झाली असून खरोखरच पाकिस्तानच्या जनतेवर गवत खाण्याची वेळ आलेली आहे, असे शेरे नेटकर मारत आहेत. तर ‘आम्ही हजार वर्षांपर्यंत भारताशी युद्ध करीतच राहू’, अशी वल्गना पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केली होती, त्याचे काय झाले? असे सोशल मीडियावर भारतीय विचारत आहेत.

leave a reply