रशियाच्या ‘स्प्रिंग ऑफेन्सिव्ह’च्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ युक्रेनच्या दौऱ्यावर

Spring Offensiveकिव्ह/वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाकडून युक्रेनविरोधात ‘स्प्रिंग ऑफेन्सिव्ह’ राबविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दावे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी घेतलेल्या विविध बैठका, नवी सैन्यभरती, संरक्षणदलातील बदल या सर्व गोष्टी नव्या आक्रमणाच्या तयारीचे संकेत असल्याचे या दाव्यांमध्ये सांगण्यात आले आहे. रशियाकडून सुरू असलेल्या या तयारीच्या पार्श्वभूमीवरच युक्रेन व पाश्चिमात्य आघाडीनेही हालचाली सुरू केल्या असून अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने युक्रेनला दिलेली भेट त्याचाच भाग ठरतो.

mark mileyसोमवारी अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेंडी शेरमन, राष्ट्रीय उपसल्लागार जॉन फायनर, संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी कॉलिन कॅहल युक्रेनच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. रशियाच्या आक्रमणाविरोधात अमेरिकेने युक्रेनला दिलेले समर्थन यापुढेही कायम राहिल हा विश्वास देण्यासाठी अमेरिकी शिष्टमंडळ युक्रेनला भेट देत असल्याचे परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले. हे शिष्टमंडळ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. सुरुवातीला युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी अमेरिकी शिष्टमंडळाची भेट घेतली.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ आंद्रि येर्माक यांच्याबरोबर शिष्टमंडळाची बैठक पार पडल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या बैठकीदरम्यान, युक्रेनचे लष्करी तसेच गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियाविरोधातील आघाडीवर असलेल्या परिस्थितीची माहिती अमेरिकी शिष्टमंडळाला दिली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनवरील आक्रमण अधिक तीव्र करीत असून युक्रेनसह पाश्चिमात्य आघाडीने त्याला प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे, असे शिष्टमंडळातील अमेरिकी अधिकाऱ्यांनी बजावले.

Spring-Offensiveरशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला जवळपास 25 अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य पुरविले आहे. अमेरिकी संसदेने युक्रेनसाठी अजून 45 अब्ज डॉलर्सच्या निधीला मान्यता दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेने पॅट्रियॉट क्षेपणास्त्र यंत्रणा व ब्रॅडले टँक्ससारखी प्रगत शस्त्रे युक्रेनला पुरविली आहेत. मात्र इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्रसहाय्य मिळत असतानाही युक्रेनला अपेक्षित यश मिळाले नसल्याचा सूर पाश्चिमात्य वर्तुळातून उमटत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या दोन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युक्रेनकडे काही आठवड्यांचा अवधी शिल्लक राहिल्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, युक्रेनला भेट देण्यापूर्वी अमेरिकी शिष्टमंडळाने जर्मनी तसेच पोलंडला भेट दिली. युक्रेनला होणारा शस्त्रपुरवठा तसेच लष्करी प्रशिक्षण यात दोन्ही देशांचे मोठे योगदान आहे. जर्मनीतील अमेरिकी संरक्षणतळावर 600हून अधिक युक्रेनी जवानांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख मार्क मिले यांनीही नुकतीच जर्मनीतील तळाला भेट देऊन प्रशिक्षण कार्यक्रमाची पाहणी केली. रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी, युक्रेन मोहिमेसाठी उभारण्यात आलेल्या लष्करी मुख्यालयाला भेट दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यावेळी शोईगू यांनी पूर्व युक्रेनच्या आघाडीवरील लष्करी स्थितीची माहिती घेतल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

leave a reply