महाराष्ट्रात एका दिवसात ३० हजार नवे रुग्ण

३० हजारनवी दिल्ली – रविवारी महाराष्ट्रात चोवीस तासात ३० हजार ५०० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ९९ जणांचा बळी गेला आहे. शनिवारी राज्यात चोवीस तासात २७,१२६ नवे रुग्ण आढळले होते. हा आतापर्यंचा एका दिवसात महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा उच्चांक ठरला होता. मात्र दुसर्‍याच दिवशी नवा उच्वांक नोंदविला गेला असून राज्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अधिक बिकट बनल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत असून ऍक्टीव्ह केसेसची संख्या २ लाख १० हजारांच्या पुढे पोहोचली आहे. देशात कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३ लखांवर पोहोचली आहे. यातील ७० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून प्रशासनासमोरील चिंता वाढल्या आहेत. रुग्णालये भरली असून कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. ‘लॉकडाऊन’ करायला लावू नका? नागरिकांनी मास्क लावा, सोशल डिस्टंसिंगसारख्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. मात्र कित्येक ठिकाणी गर्दी उसळल्याचे आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहे.

रविवारी मुंबईत ३ हजार ३७७५ नवे रुग्ण आढळले आहेत, तसेच १० जणांचा बळी गेला आहे. नागपूर जिल्ह्यात ३,६१४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३२ जण दगावले आहेत. ठाणे मंडळात ६९७० नवे रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण पुणे मंडळात ६१५१ नवे रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक संख्या पुणे महापालिका क्षेत्रात आहे. नाशिक मंडळत ५६६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या सहा राज्यातच देशातील ८३.१४ टक्के नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच सर्वाधिक मृत्यु ही याच सहा राज्यांमध्ये झाले आहेत. देशात कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढला असॅन ४.५ कोटी जणांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. दिवसाला सुमारे ३० लाखांहून अधिक जणांचे लसीकरण होत आहे. महाराष्ट्रात रविवारी दोन लाख जणांचे लसीकरण झाले आहे.

leave a reply