अमेरिका, फ्रान्स, जपान व बेल्जिअम आखातात नौदल सराव आयोजित करणार

दुबई – आखातातील सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अमेरिका आणि मित्रदेशांचे नौदल लवकरच या क्षेत्रात युद्धसरावाचे आयोजन करणार आहे. यामध्ये अमेरिकेसह फ्रान्स, जपान आणि बेल्जिअमच्या युद्धनौका सहभागी होतील, अशी घोषणा अमेरिकेच्या नौदलाने केली. काही दिवसांपूर्वीच या सागरी क्षेत्रात इस्रायलच्या व्यापारी जहाजात संशयास्पद स्फोट झाला होता. या स्फोटामागे इराण असल्याचा दावा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व मित्रदेशांच्या युद्धसरावाचे महत्त्व वाढले आहे.

ओमानचे आखात आणि हिंदी महासागरी क्षेत्राच्या क्षेत्रात हा युद्धसराव होणार आहे. अमेरिकेच्या नौदलाने या युद्धसरावाचे दिवस जाहीर केलेले नाहीत. पण या युद्धसरावात फ्रान्सची विमानवाहू युद्धनौका ‘चार्ल्स दी गॉल’, अमेरिकेची ऍम्फिबियस युद्धनौका ‘युएसएस मकिन आयलँड’, जपानची ‘जेएस एरियाके’ तर बेल्जिअमची ‘लिओपोल्ड १’ विनाशिका सहभागी असतील. याशिवाय चारही देशांची लढाऊ विमानेही या सरावाचा भाग असणार?आहेत.

आपल्या सागरी हद्दीजवळ होणार्‍या या युद्धसरावावर इराणने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आक्रमक अणुकार्यक्रम राबविणार्‍या इराणला इशारा देण्यासाठी हा युद्धसराव आयोजित करण्यात आल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. गेल्याच आठवड्यात इराणने अराक अणुप्रकल्पातील हालचाली वाढविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर नातांझ अणुप्रकल्पातही युरेनियमचे संवर्धन आणि सेंट्रिफ्यूजेसवर काम सुरू केले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी इराणच्या या आण्विक हालचालींवर टीका केली होती, याकडेही पाश्‍चिमात्य माध्यमे लक्ष वेधत आहेत.

आखाती क्षेत्रातील या युद्धसरावात सहभागी झालेल्या जपान-बेल्जिअम आणि इराणमध्येही गेल्या काही महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात बेल्जिअमच्या न्यायालयाने इराणचे राजदूत असादुल्ला अस्सादी यांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २०१८ साली इराणच्या राजवटीविरोधात फ्रान्समध्ये आयोजित केलेल्या सभेत दहशतवादी हल्ला घडविण्याच्या कटात अस्सादी सहभागी असल्याचे उघड झाले होते. तर गेल्या वर्षी जपानच्या जहाजावर झालेल्या हल्ल्यामागे इराण किंवा इराणसंलग्न गट असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. या पार्श्‍वभूमीवर, सदर युद्धसरावात फ्रान्स, जपान आणि बेल्जिअमचा सहभाग इराणला इशारा देणारा असल्याचे दिसत आहे.

leave a reply