चीनच्या शेकडो मिलिशिया जहाजांची फिलिपाईन्सच्या हद्दीत घुसखोरी

मिलिशियामनिला – गेल्या दोन आठवड्यांपासून चीनच्या २२० मिलिशिया जहाजांनी फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केली आहे. चीनच्या या घुसखोरीवर फिलिपाईन्सकडून एवढ्या दिवसात पहिल्यांदाच प्रतिक्रिया येत आहे. ‘चीनने फिलिपाईन्सच्या सागरी अधिकारांचे उल्लंघन करून सार्वभौम सागरी क्षेत्रात सुरू केलेली घुसखोरी थांबवावी आणि आपली जहाजे माघारी घ्यावी’, अशी मागणी फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेंझा यांनी केली. फिलिपाईन्सच्या हद्दीतील चीनच्या जहाजांची घुसखोरी दुअर्ते सरकारवर दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचा दावा केला जातो.

७ मार्च पासून चीनच्या २२० जहाजांनी फिलिपाईन्सच्या ‘जुलियन फिलिप’ या द्विपाच्या हद्दीत नांगर टाकला आहे. या जहाजांमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतलेले मिलिशिया असल्याचा आरोप फिलिपाईन्सचे सरकार करीत आहे. फिलिपाईन्सच्या पलावान प्रांतापासून १७५ सागरी मैल अंतरावर असलेल्या या द्विपावर या आग्नेय आशियाई देशाचा अधिकार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून चीनच्या या मिलिशिया जहाजांनी घुसखोरी केलेली असूनही शनिवारी पहिल्यांदा फिलिपाईन्सच्या सरकारने याची माहिती उघड केली.

मिलिशिया

तसेच लष्करी अधिकार्‍यांनी तक्रार केली तर आपण या घुसखोरीबाबत चीनला विचारणा करू, अशी मवाळ भूमिका फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री थिओडोर लॉक्सिन यांनी स्वीकारली. रविवारी फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री लॉरेंझा यांनी चीनच्या या घुसखोरीवर टीका केली. तसेच मिलिशिया जहाजांना या सागरी क्षेत्रात दाखल करून चीनने फिलिपाईन्सच्या सागरी अधिकारांचे उल्लंघन केल्याचा ठपका संरक्षणमंत्री लॉरेंझा यांनी ठेवला. चीनने या सागरी क्षेत्राचे लष्करीकरण थांबवून आपली जहाजे माघारी घ्यावीत, असे आवाहन लॉरेंझा यांनी केले.

फिलिपाईन्सच्या या भूमिकेवर चीनने प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच चिनी जहाजे रविवारपर्यंत सदर सागरी क्षेत्रातच उपस्थित होती. चीनने फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्राचे लष्करीकरण सुरू केल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय न्यायालयाने साधारण पाच वर्षांपूर्वी केला होता. तसेच चीनने फिलिपाईन्सच्या हद्दीतून माघार घ्यावी, असेही सुचविले होते. पण चीनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाला काडीचीही किंमत दिलेली नाही. तर २०१६ साली फिलिपाईन्सची सूत्रे हाती घेणारे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनीही चीनबाबत मवाळ भूमिका स्वीकारल्याची टीका त्यांचे राजकीय विरोधक करीत आहेत. फिलिपाईन्समधील पायाभूत सुविधांसाठी चीनची गुंतवणूक तसेच व्यापार मिळविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष दुअर्ते चीनचा विरोध करायला तयार होत नाहीत, असा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जात आहे.

leave a reply