चीनच्या 34 लढाऊ विमानांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

तैवानने क्षेपणास्त्र यंत्रणा सज्ज केली

तैपेई – चीनची 34 लढाऊ विमाने आणि नऊ विनाशिकांनी ‘मिडियन लाईन’ ओलांडून आपल्या हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप तैवानने केला. चीनच्या या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून तैवानने देखील लढाऊ विमाने व विनाशिका रवाना केल्या. त्याचबरोबर आपली क्षेपणास्त्र यंत्रणा देखील सज्ज केल्या होत्या. तैवानच्या या तयारीनंतर चीनच्या विमानांनी माघार घेतली. पण यामुळे चीनची तैवानबाबतची आक्रमकता वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

china jetsचीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या जे-11, जे-10 आणि जे-16 लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. चीन आणि तैवानमधील बफर झोन म्हणून ओळखली जाणारी ‘मिडियन लाईन’ पार करून चीनच्या विमानांनी तैवानला चिथावणी दिली. तर चीनच्या नऊ विनाशिकांनी देखील तैवानच्या आखातात प्रवेश केला. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चीनची विमाने आणि विनाशिकांची ही घुसखोरी सुरू होती.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या घुसखोरी विमाने आणि विनाशिकांना माघार घेण्याची सूचना केली. पण प्रतिसाद न मिळाल्याने तैवानने आपली लढाऊ विमाने आणि विनाशिका चिनी विमाने-विनाशिकांच्या दिशेने रवाना केली. त्याचबरोबर चीनने आगळीक केलीच तर पुढील तयारी म्हणून आपली क्षेपणास्त्र यंत्रणा देखील तयार ठेवली. यानंतर चीनची विमाने आणि विनाशिकांनी तैवानच्या हद्दीतून माघार घेतली.

चीनची विमाने-विनाशिका जवळपास दररोज तैवानच्या हवाई व सागरी हद्दीजवळ घुसखोरी करीत असल्याचे अमेरिकेतील माध्यमे लक्ष वेधत आहेत. चीन 2025 सालापर्यंत तैवानचा ताबा घेईल, असे इशारे अमेरिकेचे वरिष्ठ नेते तसेच लष्करी अधिकारी देत आहेत. बायडेन प्रशासनाने चीनचा हल्ला रोखण्यासाठी या तैवानला शस्त्रसज्ज करावे, असेही अमेरिकेचे नेते बजावत आहेत. तर तैवानवरील हल्ल्यामुळे आपली सुरक्षाही धोक्यात येईल, असा इशारा जपानने दिला होता. पण बायडेन प्रशासन चीनविरोधात उघड भूमिका स्वीकारण्यास तयार नसल्याची टीका अमेरिकेत होत आहे.

leave a reply