राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल अमेरिकेच्या दौऱ्यावर

वॉशिंग्टन – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांची अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्याशी चर्चा पार पडली. भारत व अमेरिकेमधील ‘इनिशिएटीव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज्‌‍-आयसीईटी’च्या बैठकीत अजित डोवल सहभागी झाले. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री गिना रायमोंडो, उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन, नासाचे प्रशासकीय अधिकारी बिल नेल्सन आणि अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांच्याशीही डोवल यांची चर्चा पार पडली. तसेच दोन्ही देशांमधील बिझनेस फोरमला देखील सुरक्षा सल्लागारांनी संबोधित केले.

उदयाला येत असलेल्या नव्या व प्रगत तंत्रज्ञानासंदर्भात सहकार्यासाठी भारत व अमेरिकेमध्ये ‘आयसीईटी’ची स्थापना झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात गेल्या वर्षी जपानच्या टोकिओमध्ये झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये हा उपक्रम सुरू झाला होता. अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या ‘आयसीईटी’ परिषदेत डोवल सहभागी झाले. या परिषदेत त्यांनी जागतिक पुरवठा साखळीसाठी भारत हा विश्वासार्ह देश ठरेल, असे ठासून सांगितले. तसेच भारत जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाशी निगडीत पुरवठा साखळीसाठी भारत फार मोठे योगदान देऊ शकेल, असा विश्वास यावेळी डोवल यांनी व्यक्त केला.

‘युएसइंडिया बिझनेस काऊन्सिल’ला संबोधित करताना डोवल यांनी भारत व अमेरिकेमधील सहकार्याचे उद्दिष्ट व संकल्पना प्रत्यक्षात उतरायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ज्या क्षेत्रात सहकार्य शक्य आहे, तिथे नियोजित वेळेत ते साध्य करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे डोवल यांनी सुचविले आहे.

leave a reply