महाराष्ट्रात चोवीस तासात ३७६ जणांचा बळी

नवी दिल्ली/मुंबई – गुरुवारी महाराष्ट्रात चोवीस तासात ३७६ जणांचा बळी गेला आहे. तसेच ५६ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक नागपूरमध्ये गेले असून येथे चोवीस तासात कोरोनाने ७३ मृत्युंची नोंद करण्यात आली आहे. देशभरात कोरोनाची आलेल्या नवीन लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला व लसीकरण कार्यक्रमाचे व्यवस्थापन निटपणे करण्याच्या सूचना दिल्या. ११ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत लसीकरण उत्सव आयोजित करून या काळात पात्र नागरिकांचे कशाप्रकारे जास्तीत जास्त लसीकरण करता येईल, याकडे लक्ष पुरवावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

Advertisement

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू असून लाखापेक्षा जास्त रुग्ण दरदिवशी आढळत आहेत. बुधवारपासून गुरुवारच्या सकाळपर्यंत एक लाख २६ हजार रुग्णांची देशभरात नोंद झाली. तसेच याच चोवीस तासात ६८५ जणांचा बळी गेला. मुंबईत ९ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली, तसेच २३ जण दगावले. पुणे जिल्ह्यात १२ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नांेंद झाली, तर ४६ जणांचा या साथीने बळी गेला.

महाराष्ट्रासह इतर राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांबाबत पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांबरोबर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चिंता व्यक्त केली. गेल्यावर्षीपेक्षा जास्त रुग्ण आढळत असले, तरी व्यवस्थापनाच्या व प्रशासनाच्या आघाडीवर आपण कमी पडत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्यावर्षी या साथीशी लढण्याचा आपल्याकडे अनुभव नव्हता. पण तरीही आपण त्यावर मात करण्यात यशस्वी ठरलो. आता आपल्याकडे अनुभवही आहे व लसही त्यामुळे आपण पुन्हा या साथीवर विजय मिळवू असे पंतप्रधान म्हणाले.

मात्र सर्वच गोष्टींचे व्यवस्थान निट होणे आवश्यक आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या आघाडीवर काही राज्ये कमी पडत आहेत. गेल्यावर्षीपासून या साथीशी झगडताना यंत्रणेत एकप्रकारचा थकवा आला असेल, त्यामुळे हव्या त्या प्रमाणात लक्ष पुरविण्यात प्रशासन कमी पडत असेल. मात्र तसे होता कामा नये. जास्तीत जास्त जणांचे लसीकरण हासुद्धा उद्देश आहे. ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरणावर भर द्यावा. लसींची कमतरता नसून सर्व राज्यांना पुरेशा लसी पुरविण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

leave a reply